लातूर जिल्ह्य़ात तिसऱ्या दिवशीही झालेल्या अवकाळी पावसाने आंबा, डाळिंब, केळी, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ व पाणीटंचाईने आधीच त्रासलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने चांगलेच खिंडीत गाठले आहे.
लातूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या वेळी अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले, तर काही ठिकाणी झाडे पडली. असह्य़ उष्म्याने हैराण झालेल्या लातूरकरांना या पावसामुळे हवेतील सुखद गारव्याचा दिलासा मिळाला असला, तरी शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरीवर्ग मात्र चांगलाच हबकून गेला आहे. वादळी वाऱ्यामुळे लातूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा दोन तास बंद पडला होता. औसा तालुक्यात वीजतारा तुटल्याने दिवसभर वीज खंडित झाली होती. परिणामी लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. गातेगाव येथे २५, तर बल्लाळनाथ येथे १९ मिमी पावसाची नोंद झाली.