जूनच्या अखेरच्या आठवडय़ात नागपूर जिल्ह्य़ात एवढा जबरदस्त पाऊस होईल, याची पूर्वकल्पना नसलेले जिल्हा प्रशासन पावसाने माजविलेल्या हाहाकाराने अक्षरश: हादरले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्य़ातील नद्या आणि नाल्यांना आलेले पूर, रस्त्यांवर साचलेले पाणी याच्या मुकाबल्यासाठी प्रशासनाची यंत्रणा पुरेशा प्रमाणात सज्ज नव्हती, असेच चित्र यातून निर्माण झाले आहे. संततधारेचा तडाखा नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ाला बसला. मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत झालेल्या पावसाने आपत्ती निवारण यंत्रणेचे अक्षरश: वाभाडे काढले. नागपूरच्या इतिहासात एवढा पाऊस एकाच दिवसात पहिल्यांदाच कोसळल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. येत्या ४८ तासात आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शहर नियोजन आराखडय़ाचे वाभाडे काढणाऱ्या पावसात शहरातील प्रत्येक रस्ता जलमय झाला होता. गटारे तुंबल्याने गटारांमधील घाण रस्त्यांवर आली आहे. अगदी पॉश समजल्या जाणाऱ्या भागांमध्येही पावसाचे पाणी घरात शिरले. शहरातील शेकडो अपार्टमेंटमध्ये पाणी शिरल्याने वाहने रात्रभर पाण्यावर तरंगताना दिसत होती. रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ही स्थिती उद्भवली, असे अनेक नागरिकांनी ‘?‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. पावसाळी नियोजनासाठी नाले, गटारांची सफाई उन्हाळ्यातच आवश्यक असताना अनेक कामे प्रलंबित होती. त्याचा तडाखा शेकडो वस्त्यांना बसला.  प्रादेशिक हवामान खात्याच्या कार्यालयाने येत्या ३६ तासात जोरदार पावसाचा इशारा दिल्याने यंत्रणा हादरली आहे. सोमवार आणि मंगळवारसारखा पाऊस झाला तर संपूर्ण नियोजनलाच हरताळ फासला जाईल, असेच चित्र आहे. आज सकाळी पावसाने उघडीप दिल्याने वस्त्या वस्त्यांमधील लोक पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होते. अनेक ठिकाणी अग्निशमन विभागाच्या गाडय़ा पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे कंबरेपर्यंत पाणी साचलेल्या घरांमध्ये हाहाकार माजला होता. लोक जमेल तसे पाणी बाहेर फेकताना दिसत होते. घरातील सामानाचे पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे कारण नाल्यांना आलेला पूर आणि तुंबलेली गटारे हेच आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पावसाळीपूर्व कामे पूर्ण केल्याचे केलेले दावे फोल असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.