* आतापर्यंत गतवर्षीपेक्षा ४३४८ मिलीमीटर अधिक पाऊस
* मोठय़ा व मध्यम प्रकल्पात जलसाठय़ाचे ‘अर्धशतक’
सलग तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी ओसरला असून मागील चोवीस तासात संपूर्ण जिल्ह्यात केवळ ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे धरणातून सोडलेला पाण्याचा विसर्गही एकतर थांबविण्यात आला अन्यथा तो बराच कमी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तीन प्रकल्प १०० टक्के भरले असून अन्य सात प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ४,३४८ मिलीमीटर अधिक पाऊस झाला. त्यामुळे मोठय़ा व मध्यम प्रकल्पाच्या एकूण क्षमतेपैकी ऑगस्टच्या प्रारंभीच निम्मा जलसाठा झाल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. जिल्ह्यात सलग काही दिवस पावसाचा जोर कायम राहिला. त्यात चार ते पाच तालुक्यात दमदार पाऊस झाला असला तरी उर्वरीत भाग दमदार पावसापासून वंचित राहिला. या सर्व परिसरात सोमवारी पावसाचा जोर ओसरल्याचे पहावयास मिळाले. यापूर्वी संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी ४५० ते ४९० मिलीमीटर पावसाची झालेली नोंद सोमवारी ८० ते ९० टक्क्यांनी कमी झाली. विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागात हे प्रमाण १४ ते ५ मिलीमीटर दरम्यान येऊन स्थिरावले. नाशिक, दिंडोरी, मालेगाव, नांदगाव, कळवण, बागलाण व येवला या तालुक्यात पावसाचे स्वरूप रिमझिम राहिले. चांदवड, देवळा, निफाड, सिन्नर या भागांत तर रिमझिम पावसाचीही नोंद झाली नाही. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४३४८ मिलीमीटर अधिक पाऊस झाला. मागील वर्षी ऑगस्टच्या सुरूवातीपर्यंत ६१०० मिलीमीटर पाऊस झाला होता. या वर्षी हे प्रमाण १०,४४८ मिलीमीटरवर पोहोचले आहे. समाधानकारक पावसामुळे धरणातील जलसाठय़ांमध्ये लक्षणिय वाढ झाली. सोमवारी पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडलेले पाणी एकतर बंद अथवा कमी करण्यात आले. विसर्ग बंद झालेल्या धरणांमध्ये गंगापूर, कडवा यांचा तर विसर्गाचे प्रमाण कमी केलेल्या धरणात पालखेड (४३७ क्युसेक्स), दारणा (१३५० क्युसेक्स), नांदूरमध्यमेश्वर (१६१४) यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील भावली, आळंदी व हरणबारी ही धरणे पूर्ण भरली आहेत. गंगापूर (७९ टक्के ), पालखेड (९८ टक्के), वाघाड (९०), पुणेगाव (६८), दारणा (६७), वालदेवी (८२), कडवा (७१) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित काश्यपी (५६ टक्के), गौतमी-गोदावरी (६४), करंजवण (६०), मुकणे (४७), भोजापूर (६०), चणकापूर (६१), पुनद (४३), केळझर (६३), नाग्यासाक्या (५), गिरणा (१०) भरली आहेत. या वर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ५० टक्के जलसाठा झाला आहे. मोठय़ा व मध्यम प्रकल्पांची एकूण ६६, ३५४ दशलक्ष घनफूटपैकी आतापर्यंत ३२,८६६ दशलक्ष घनफूट जलसाठा झाल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.