tv09शहरात उभारण्यात येणाऱ्या नव्या इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचय कार्यक्रमाची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची गरज या क्षेत्रातील जाणकारांमधून व्यक्त होत आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळणार नाही, असा नियम ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांनी केला आहे. या नव्या नियमामुळे गेल्या सहा वर्षांमध्ये ठाणे शहरातील ७९४ इमारतींमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरामध्ये २००७ पासून ९३६ इमारतींना अशी प्रणाली सुरू केल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात यापैकी किती यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित आहेत, याची माहिती मात्र महापालिका प्रशासनाकडे नाही.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून अनेक ठिकाणी अनधिकृतपणे कूपनलिका लावून जमिनीखालील पाण्याचा मोठय़ा प्रमाणात उपसा केला जातो. त्यामुळे भूजल पातळीही खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत पर्जन्य जलसंचयचा उपयोग होऊ शकतो. पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थांनी शहरामध्ये या प्रकारचे उपक्रम राबवण्याविषयी जनजागृती केली आहे. काळाजी गरज ओळखून महापालिकेनेही ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ला चालना देण्यासाठी सुरुवात केली. त्यासाठी ठाणे महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेल्या जुन्या इमारतींना १० टक्के मालमत्ता करातून सवलत दिली. तर कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरांनी नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली आहे. त्यामुळे ठाणे, डोंबिवली अशा दोन्ही शहरांमध्ये ही यंत्रणा बसवणाऱ्यांच्या संख्येत मागील पाच वर्षांमध्ये वाढ झाली आहे.  
मात्र, सक्तीने बसवण्यात येणाऱ्या या यंत्रणेचा नंतर अजिबात वापर होताना दिसत नाही. छतावरील पाणी जमिनीत जिरवण्याची यंत्रणा एकदा उभारली की महापालिकेचे अभियंते याची पाहणी करून भोगवटा प्रमाणपत्र देतात. मात्र भविष्यात हे प्रकल्प सुरू आहेत की नाहीत याची आणि त्यांचे काम शास्त्रोक्त पद्धतीने होत आहे की नाही याचे निरीक्षणच केले जात नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली तपासू शकतील अशी शास्त्रोक्त यंत्रणा महापालिकाने विकसित करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे, असे मत पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावलकर यांनी व्यक्त केले आहे. केवळ छतावरचे पाणी जमिनीमध्ये सोडणे इतका मर्यादित विचार करून चालणार नाही. भविष्यामध्ये शहरातील भू-रचनेचा अभ्यास करून तेथे कोणत्या प्रकारे रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येईल याचेसुद्धा सर्वेक्षण करण्याची गरज आहे, असे ते म्हणतात.
श्रीकांत सावंत, ठाणे