सकाळी सात वाजल्यापासूनच प्रमुख उमेदवारांचे बूथ मतदान केंद्र परिसरात लागायला सुरुवात झाली होती. मतदार याद्या व लॅपटॉप घेऊन कार्यकर्ते आपापल्या बूथवर हजर होते व येणा-या मतदारांना यादीमधील त्यांची माहिती शोधून देत होते. उमेदवार जितका मोठा, तितकी चांगली व्यवस्था त्या त्या बूथवर बघायला मिळत होती. काही कार्यकर्त्यांच्या नशिबात शामियाना होता तर अनेकांना झाडाखालीच आपले बस्तान मांडावे लागले. पुरुष कार्यकर्त्यांप्रमाणेच बूथवरील महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती व त्यातही महाविद्यालयीन तरुणींचा भरणा अधिक होता. सकाळच्या सत्रात मोठय़ा संख्येने मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले आणि वेगवेगळया बूथवर गर्दी दिसायला लागली. मात्र, अपेक्षेप्रमाणे आज मतदानाच्या दिवशी पाऊस बरसला आणि ठिकठिकाणी बूथवर बसणा-या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. पावसाचा परिणाम एकीकडे मतदारसंख्या रोडावण्यावर झाला तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना आपले बूथ सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. पावसाचा जोर वाढला आणि कित्येक ठिकाणी बूथ तात्पुरते गुंडाळून ठेवण्याशिवाय कार्यकर्त्यांसमोर पर्याय उरला नाही. पाऊस थांबल्यावर पुन्हा एकदा मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळू लागली आणि ओस पडलेल्या बूथवर वर्दळ दिसायला लागली. छापील याद्यांची पाने धुंडाळत बसण्यापेक्षा, कार्यकर्त्यांनी लॅपटॉपवरील सॉफटवेअर, इंटरनेट आणि मोबाईल अ‍ॅप्सचा आधार घेत मतदारांना त्यांची नावे शोधून देणे अधिक पसंत केले. अनेक मतदारांनी येताना मतदार यादीतील आपली माहितीही स्वत:बरोबर आणली होती. दोन मतदारसंघांच्या सीमारेषेवर असणा-या मतदारांचा मतदार केंद्रांबाबत गोंधळ उडाल्याने त्यांनी मतदान बूथवर एकच गर्दी केली होती.