28 October 2020

News Flash

पाणीच पाणी

नवे-कोरे रस्ते आणि चकचकीत नाल्यांचे आश्वासन देत पावसाळ्यापूर्वी शहरभर फिरणाऱ्या ठाणे महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाचे पितळ गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने उघडे पाडले. ठाणे शहरातील सखल

| July 13, 2013 12:28 pm

नवे-कोरे रस्ते आणि चकचकीत नाल्यांचे आश्वासन देत पावसाळ्यापूर्वी शहरभर फिरणाऱ्या ठाणे महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनाचे पितळ गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने उघडे पाडले. ठाणे शहरातील सखल भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार नवे नाहीत. यंदा मात्र उंचवटा असलेल्या परिसरातही पाण्याची तळी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले. नालेसफाई उत्तम झाल्याचा दावा यावर्षीही फोल ठरला. सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून गवगवा होत असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील नालेसफाईही यंदा उघडी पडली. या स्थानकात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसत होते. ठाणे, कळवा, मुंब्रा भागांतील काही खासगी शाळांच्या परिसरातही पाणी तुंबले. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच अडकून पडले.
गुरुवारी रात्रीपासून ठाणे तसेच आसपासच्या परिसरात पावसाची सततधार सुरू आहे. शुक्रवार उजाडताच पावसाचा जोर वाढला आणि ठाणे शहरात नाक्यानाक्यांवर पाण्याची तळी दिसू लागली. मुसळधार पावसाने ठाणे शहराला अक्षरश: झोडपून काढले. ठाण्यातील वंदना, श्रीरंग वसाहत, गोकुळनगर, उथळसर, राम मारुती रोड, गोखले मार्गाचा काही परिसर, फुलेनगर अशा भागांत दरवर्षी पाणी साचते. दरवर्षी पाणी साचण्याच्या ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, अशी घोषणा दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या अभियंता विभागाने केली. या भागातील नालेसफाई चांगल्याप्रकारे व्हावी, यासाठी प्रयत्नही केले गेले. तसेच काही ठिकाणी सखल भाग उंच करण्याचे प्रयत्नही झाले. तरीही यंदा नेहमीच्या ठिकाणी पाणी साचलेच याशिवाय ज्याठिकाणी पाणी साचत नाही, अशा टिकुजीनी वाडी, आनंदनगर, वसंतविहार परिसरांतही पाणी साचल्याचे दिसून येत होते. लुईसवाडी परिसरात काही ठिकाणी पाण्याची तळी साचली होती, तर लोकमान्यनगर परिसरातही पाणी साचल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. कापुरबावडी, किसननगर परिसरांतील नाल्यांच्या पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. टिकुजीनी वाडी परिसरात भिंती कोसळून दोन चारचाकी तर तीन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. आनंदनगर येथे भिंत कोसळल्यामुळे या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. नौपाडा येथील महाराष्ट्र विद्यालय परिसरात पाणी तुंबल्याने येथील विद्यार्थी शाळेत अडकून पडले होते. महापालिकेच्या आपतकालीन विभागातील जवानांनी शाळेतील २५० विद्यार्थ्यांची शाळेतून सुटका केली. कळव्यातील सहकार विद्याप्रसारक शाळेतही पावसामुळे विद्यार्थी अडकून पडले होते. या भागात गुडघाभर पाणी साचले होते. दादाजी कोंडदेव स्टेडीयम परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले.
कोपरीतील १२० घरांत पाणी शिरले
कोपरी येथील पाटीलवाडी भागातील सखल भागात असलेल्या चाळीमधील सुमारे १२० घरांमध्ये गटरांमधील सांडपाणी शिरले. त्यामुळे घरांतील वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच या घटनेनंतर या भागातील वीजपुरवठा खंडीत करून नागरिकांना घराबाहेर काढण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 12:28 pm

Web Title: rains continue to lash thane district
Next Stories
1 अनधिकृत बांधकामांची करणी आणि सर्वत्र पावसाचे पाणी
2 महापे-शीळ रस्त्याची चाळण
3 निसर्गाच्या शोषणाचा परिणाम..
Just Now!
X