विदर्भात झालेल्या पावसामुळे भाज्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारपेठेत भावक कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले असून सामान्य नागरिकांना पुन्हा महागाईची झळ सोसावी लागत आहे. एक महिन्याने विधानसभा निवडणुका असताना आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू स्वस्त मिळाव्या ही अपेक्षा आहे.
भाववाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसायला लागला असून किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. बहुतेक सर्व भाज्यांची ६० ते ८० रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्री केली जात असल्यामुळे घरातील बजेट विस्कळीत झाले आहे. एरवी महालक्ष्मी, गणेशोत्सव आदी सणांमध्ये भाज्यांचे भाव कडाडलेले असतात, यावेळी मात्र भाज्या स्वस्त होत्या. गणेशोत्सवानंतर भाज्या महाग झाल्या आहेत. ग्राहकांना महागाईचा फटका बसला असला तरी शेतकऱ्यांना मात्र चांगला भाव मिळत आहे.
गेल्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात पावसामुळे भाज्या खराब झाल्या त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली. एरवी कळमना आणि काँटेन मार्केटमध्ये ४० ते ५० ट्रक माल येत असताना गेल्या पाच दिवसांत १० ते १२ ट्रक माल येत असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. चिल्लर बाजारपेठेत सर्वच भाज्या साठीच्यावर गेल्याने चार-पाच भाज्या नेण्याऐवजी ग्राहक दोन किंवा तीन भाज्या घेऊन जात आहेत. विदर्भातील काही भागात पाऊस सुरू असूनही भाववाढीमुळे सर्वसामान्याला भाजी खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. नागपुरात येणारा भाजीपाला जिल्ह्य़ातील आसपासच्या गावांतून, आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांतून मोठय़ा प्रमाणात येत असतो.
या महागाईमुळे गरीब चिंताग्रस्त झाले आहेत.  महालक्ष्मीच्या दिवसात २० रुपये किलोप्रमाणे मिळालेले पालक ६० रुपये किलो, ढेमस ८० रुपये किलो प्रमाणे विकले जात आहे. किरकोळ बाजारात हिरवी मिरची ३० ते ३५ रुपये किलो, कोथिंबीर ६० ते ८० रुपये किलो, टोमॅटो ६० रुपये किलो, पालक ६० ते ७० रुपये, भेंडी ५० ते ६०, चवळी ३० ते ४०, शिमला मिरची ६०, कारले ५०, काकडी ४०, ढेमस ८०, गाजर ४०, तोंडले ४० ते ५०, कोहळे २० ते ३०, मेथी ७० ते ८०, आले ६०, लसूण ८० ते १००, मुळा ३०  प्रतिकिलो विक्रीला आहे. बटाटा, कांदे ३० ते ३५ किलोप्रमाणे विक्रीला आहे. या दरवाढीचा फटका ग्राहकांबरोबरच लहान हॉटेलचालक, भेळविक्रेते व भोजनालयांनाही बसत आहे. दैनंदिन व जीवनावश्यक गोष्टीचे दर विविध कारणाने गगनाला भिडत आहेत. सध्या पाऊस नसला तरी भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढलेले आहेत. ही नेहमीची दरवाढ पाठ सोडायला तयार नाही, पुढे पाऊस वाढला तर भाज्यांचे दर चढेच राहतील, अशी प्रतिक्रिया बुधवार बाजारातील भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.