टंचाई स्थितीवर मात करण्यास भूजलसाठा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी जलपुनर्भरण करावे, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
पाटील यांनी चालू महिन्यात दोन्ही बैठकांमध्ये टंचाईबाबत आढावा घेत असताना टंचाई स्थितीत अनेक िवधन विहिरी, विहिरी व इतर पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याचे आढळून आल्याने भूजल साठा वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याचाच भाग म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब वाया जाऊ न देता त्याचे नियोजनपूर्वक पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे आवश्यक आहे. अवैध वृक्षतोड, अति पाणीउपसा व पाण्याचे अयोग्य नियोजन यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भविष्यात टंचाईवर मात करण्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलपुनर्भरण कामाचे नियोजन करून पावसाच्या पाण्याचा अपव्यय होऊ न देता त्याचे पुनर्भरण करण्यासाठी वेळेचे नियोजन करणे व जलपुनर्भरण कार्यक्रम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले.
जिल्हय़ातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय-निमशासकीय सार्वजनिक इमारतीच्या छतावरील पुनर्भरणाची व्यवस्था करावी. सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून त्याचा प्रकल्प अहवाल सादर करावा. कामाचे योग्य नियोजन करावे व पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.