‘दुष्प्रवृत्ती मुळातूनच खुडायच्या असतात’, अशी इंग्रजी म्हण आहे. दिल्ली आणि शक्ती मिल कंपाऊंडमधील सामूहिक बलात्काराची प्रकरणे, कोवळ्या वयाच्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तर हे प्रकर्षांने व्हायला हवे. या गंभीर घटनांचे मूळ धरण्याआधीच खुडण्याच्या उद्देशाने येत्या काळात मुंबईतील महाविद्यालयांतील तरुणाई सरसावणार आहे. ‘जोर से बोलो’ म्हणत लघुपट, चर्चेच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचारांविरोधात एकवटणार आहे.
तरुणाईला चर्चेचे दरवाजे किलकिले करून देण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे ते ‘अक्षरा केंद्र’ या महिलांशी संबंधित दस्तावेजाचे काम करणाऱ्या सामाजिक संघटनेचे. याशिवाय स्त्री-पुरुष समानता, महिलांवरील अत्याचार, त्यांचे प्रश्न आदी विषयांवर अक्षरा महाविद्यालयीन तरुणांच्या मदतीने अनेक उपक्रमे राबवीत आली आहे, पण नुकत्याच घडलेल्या शक्ती मिल कंपाऊंडमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निमित्ताने तरुणांनाच छेडछाडीच्या प्रश्नावर विचार करण्यास, बोलण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न अक्षरा आपल्या ‘वी क्लब’ (थोडक्यात ‘विमेन एम्पॉवरमेंट क्लब’) या उपक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. या उपक्रमात अक्षराला एनएसएसचे सहकार्य लाभले असून त्याची सुरुवात मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी आंबेडकर महाविद्यालयातून होणार आहे. त्यानंतर कीर्ती, केसी, एमडी आदी ११ महाविद्यालयांतून वी क्लबच्या माध्यमातून जाणिवांचा जागर केला जाणार आहे.
‘मुलींची छेडछाड, त्याचे त्यांच्या आणि कुटुंबीयांवर होणारे परिणाम, ही छेडछाड वेळीच थांबली नाही तर त्याची होणारी गंभीर परिणती यावर तरुणांनीच तयार केलेला ‘जोर से बोलो’ हा लघुपट आधी विद्यार्थ्यांना दाखविला जाईल. यात छेडछाडीचे प्रश्न धसास लावणाऱ्या तरुणींच्या काही सकारात्मक गोष्टीही आहेत. त्यानंतर  ‘जागो रे’सारख्या स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेले एक-दोन मिनिटांचे लघुपट दाखवून विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाईल. यानंतर आपण या संबंधात काय करू शकतो, यावर प्रत्येकाने आपले मत व्यक्त करायचे आहे,’ असे या कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना अक्षराच्या नंदिता शहा यांनी सांगितले. या कार्यक्रमातून छेडछाड, महिलांवरील अत्याचार आदी विषयांवर तरुणाईला विचार करण्यास प्रवृत्त केले जाईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

छेडछाडही तितकीच गंभीर
बलात्कार आणि छेडछाड यामध्ये तीव्रतेच्या पातळीवर फरक असला तरी छेडछाड ही कुठे तरी पुढच्या गंभीर घटनांची सुरुवात आहे. आज एखाद्या मुलीची छेड काढून वा तिची गंमत करून थोडा फार आनंद मिळत असला तरी काही प्रकरणांमध्ये तो पुढे विकृतीच्या पातळीवर वाढत जातो. मुलांच्या नकळत होणाऱ्या या प्रकारांचे गांभीर्य त्यांना वेळीच समाजावून सांगणे महत्त्वाचे आहे.
नंदिता शहा