News Flash

सोलापूर कृषी बाजार समितीत रविवारपासून बेदाण्यांचे सौदे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने येत्या रविवारी, १७ मार्चपासून बेदाणे सौदे सुरू होत आहेत. हे बेदाणे सौदे दर रविवारी दुपारी दोन वाजता होणार आहेत,

| March 14, 2013 08:47 am

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने येत्या रविवारी, १७ मार्चपासून बेदाणे सौदे सुरू होत आहेत. हे बेदाणे सौदे दर रविवारी दुपारी दोन वाजता होणार आहेत, अशी माहिती सोलापूर बाजार समितीचे सभापती, आमदार दिलीप माने यांनी सांगितली.
सोलापूर जिल्हय़ात द्राक्षलागवडीमुळे मोठय़ा प्रमाणात बेदाण्यांचे उत्पादन घेतले जाते. परंतु विक्रीची व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे बेदाणे उत्पादन शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. हा शेतीमाल विकण्यासाठी त्यांना इतरत्र जावे लागत असे. त्यामुळे सोलापुरातच बेदाण्यांचे सौदे सुरू व्हावेत, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न हाती घेतले होते. यासंदर्भात सांगली व तासगाव येथील बेदाणे व्यापाऱ्यांबरोबर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत दोन वेळा बैठकाही झाल्या. परंतु बेदाणे सौद्याचे दिवस वाटून दिल्याने सोलापुरात बेदाणे सौदे सुरू करण्यासाठी मार्ग निघत नव्हता. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत दिवसाऐवजी व्यापाऱ्यांची विभागणी करण्याचे ठरले. त्यामुळे सोलापुरात बेदाणे सौदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते सोलापूर कृषी बाजार समितीत बेदाणे सौदे सुरू करण्याचा शुभारंभ करण्याचा मनोदय होता. परंतु पाटील यांची वेळ मिळत नसल्याने बेदाणे सौद्यांचा औपचारिक शुभारंभ पुढे ढकलण्यात आला असला तरी प्रत्यक्षात येत्या रविवारपासून हे सौदे सुरू होतील, असे सभापती तथा आमदार दिलीप माने यांनी सांगितले.
बेदाणे सौदे सुरू करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आवश्यक शीतगृहासह सर्व सुविधा उपलब्ध असून शीतगृहात बेदाणे ठेवण्यासाठी प्रति टन केवळ तीनशे रुपये दरआकारणी केली जाणार आहे. शीतगृहात ठेवलेल्या मालावर विविध बँकांकडून तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आमदार माने यांनी नमूद केले. बेदाण्यांचे सौदे करण्यासाठी व्यापाऱ्यांना परवानेही दिले जाणार आहेत. त्याचा बेदाणे सौद्यावर दोन टक्के आडत आकारली जाणार आहे. त्याचा लाभ बेदाणे उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आमदार माने यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 8:47 am

Web Title: raisins deal in solapur agricultural market committee from sunday
Next Stories
1 महसूल पथकाच्या मारहाणीत वाळू वाहतूकदार ठार
2 जलसंधारण नसल्यानेच मराठवाडा तहानलेला
3 विद्यापीठ उपकेंद्र वर्षभरात मार्गी लागेल- कुलगुरू
Just Now!
X