विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्यामुळे जाग आलेल्या राज ठाकरे यांनी पुढील दोन वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नव्याने मनसेची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे घडले, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आगामी काळात पक्ष बांधणीवर प्रामुख्याने भर दिला जाणार असून पदाधिकारी व नगरसेवक आपल्या अडचणींबाबत इ मेलद्वारे थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. पदाधिकारी, नगरसेवक आणि राज यांच्यात पडलेले अंतर कमी करण्यासाठी हा नवीन मार्ग अनुसरण्यात आला आहे. पालिका निवडणुकीआधी काय करणे गरजेचे आहे या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली. राज यांच्या दौऱ्यास अनुपस्थित राहिलेले माजी आमदार वसंत गिते आणि माजी जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांचा विषय संपुष्टात आला आहे. जे पक्षासोबत आहेत, त्यांना घेऊन पुढील काम केले जाणार असल्याचे राज यांनी नमूद केले.
कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून उदयास आलेल्या नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पालिकेची सत्ता हाती असुनही दोन मतदारसंघात तर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली. स्थानिक पातळीवर मनसेविषयी असणाऱ्या नाराजीचा हा परिपाक असल्याचे पुढे आले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज यांनी शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने कामास सुरुवात केली. पालिका मुख्यालयात सकाळी आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. गोदा पार्क, बगीचा व इतर महत्वपूर्ण प्रकल्पांमध्ये लक्ष घालावे, असे राज यांनी सूचित केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, माजी आमदार नितीन भोसले, स्थायी सभापती राहुल ढिकले, सभागृह नेता शशिकांत जाधव आदी उपस्थित होते. त्यानंतर राज हे मनसेच्या राजगड कार्यालयात दाखल झाले. या ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची गर्दी असली तरी सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे अनुक्रमे गिते व ठाकरे हे अनुपस्थित होते. आदल्या दिवशी उभयतांनी राज यांच्या स्वागताला हजर राहणे टाळले होते.
पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज यांनी कोणाचे नांव न घेता ज्यांना पक्षात काम करायचे नाही, ज्यांना यायचे नाही त्यांचा विषय संपुष्टात आल्याचे सांगितले. सद्यस्थितीत जे सोबत आहे, त्यांच्या मदतीने आपणास पुढील काम करायचे असल्याचे स्पष्ट केले. एका पराभवाने खचून जाणाऱ्यांपैकी आपण नाही. लहानपणापासून आपण पराभव पाहिला आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे काम चांगले आहे. पुढील काळात सर्वाना अधिक चांगल्या पध्दतीने काम करायचे आहे. त्याकरिता आपण चौकट निश्चित करून देत असून त्यात सर्वानी काम करावे, असेही राज यांनी सांगितल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. सिडको व सातपूर भागातील नगरसेवक, विभागप्रमुख व इतर पदाधिकारी यांच्याशी राज यांनी वैयक्तिक चर्चा केली. कोणाला पाच मिनिटे तर कोणाला त्याहून अधिक वेळ देत त्यांनी संवादाचा पूल बांधला. काही समस्या असल्यास न्इ मेलद्वारे संपर्क साधू शकतात. इ मेल आयडी त्यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिला. पक्षाची नव्याने संघटनात्मक बांधणी केली जाईल. जिथे पदाधिकारी नाहीत, तिथे नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. सर्वानी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. सुमारे तीन तास ही चर्चा झाली. शनिवारी अन्य विभागातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी याच पध्दतीने राज हे चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळले. नगरसेवकांकडून केली जाणारी कामे नागरिकांपर्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत मनसेची पालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी काय करता येईल या अनुषंगाने राज यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा निश्चित करण्यावर भर दिला.

निमित्त मिसळचे, पण उद्देश..
राज ठाकरे हे नेहेमी दुरचित्रवाणीवर भाषणे ठोकताना दिसतात, पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत नाहीत, पक्ष बांधण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले, जनतेत मिसळत नाहीत.. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर घेतल्या गेलेल्या अशा आक्षेपांवर राज ठाकरे यांनी आपल्या परीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत ते थेट कॉलेज रोडवरील हॉटेलमध्ये गेले. तेथील मिसळ प्रसिध्द आहे. मिसळीचा आस्वाद घेताना त्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांशी मनमोकळेपणे गप्पा मारल्या. हॉटेलमध्ये राज आल्याचे पाहून नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीनंतर राज यांचा वारु जमिनीवर आल्याची त्यांची प्रतिक्रिया होती.

Jalna lok sabha election २०२४, congress, Dr kalyan kale
डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारीने जालन्याची लढत आता लक्षवेधक ठरणार
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता
Naxalites active again in Lok Sabha election hype Brutal killing of tribal citizen in Gadchiroli
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या