राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील बारकावे पाहावे लागतात आणि त्याचा उपयोग दुष्काळाबाबत धोरणात्मक निर्णय घेताना होतो. परंतु दुष्काळी भागाला मंत्र्यांनी भेट देण्यास ‘भंपकपणा’ असल्याचे कोणी म्हणत असतील तर तेच स्वत: भंपक आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.
रविवारी सकाळी येथे पत्रकार परिषदेत पवार यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेताना त्यांना ‘भंपक’ म्हणून संबोधले. सोलापूर शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत सोलापूर महापालिकेकडे पाणीपुरवठय़ासाठी कायमस्वरूपी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची सबब निदर्शनास आणली गेली. त्यावर पवार यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ठोबळे हेच सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी या प्रश्नाकडे कसे लक्ष घातले नाही, हे ठाऊक नाही. परंतु येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्गी लावून सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील जुन्या मौल्यवान दागिन्यांच्या कथित गहाळ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचेही आश्वासन दिले.