लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही दाणादाण उडाल्यानंतर केवळ पदाधिकाऱ्यांच्या गराडय़ात वावरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन त्यांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा मनोमीलनाचा कार्यक्रम येत्या सोमवारपासून डोंबिवलीतून सुरू होणार आहे. या मनोमीलनाच्या माध्यमातून राज ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मनसेची पुरती दाणादाण उडाल्यामुळे हा पक्ष बुडणार, शिवसेनेत विलीन होणार अशा वावडय़ा उठल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर पक्षाची यापुढील भूमिका, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक यांची मते जाणून घेण्यासाठी राज ठाकरे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मिसळणार आहेत. आतापर्यंत राज ठाकरे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याच कोंडाळ्यात वावरत होते. जाहीर सभा असली की फक्त कार्यकर्त्यांना साहेबांचे तोंड दिसायचे. तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे आपण जाणत नाही तोपर्यंत पक्षाची खरी भूमिका ठरवता येणार नाही याची जाणीव राज यांना झाल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर मनोमीलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. डोंबिवलीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कल्याण, डोंबिवली परिसरातील मनसे कार्यकर्त्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक मनसे नगरसेवक कल्याण डोंबिवली पालिकेत निवडून आले. त्यामुळे अमरावतीऐवजी डोंबिवली हे पायगुणाचे ठिकाण निवडण्यात आल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत हे दाखवण्यासाठी डोंबिवली शहर शाखेतर्फे चलो कृष्णकुंज अशी हाक देण्यात आली आहे. मोठय़ा संख्येने कार्यकर्ते कृष्णकुंजवर जाऊन धडकणार आहेत.