बऱ्याच भवती न् भवतीनंतर गोदा उद्यानाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कामाची पाहणी केली. विधानसभा निवडणुकीआधी गोदा उद्यानाच्या प्राथमिक टप्प्याचे काम पूर्णत्वास नेण्याचा पालिकेतील सत्ताधारी मनसेचा प्रयत्न आहे. या वेळी उद्यानाच्या जागेत भुजबळ फाऊंडेशनमार्फत उभारण्यात आलेली ‘ग्रीन जिम’ काढून टाकण्याची सूचना राज यांनी केली. या दौऱ्यानंतर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राज यांनी इतर कामांचा आढावा घेतला.
लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेल्यामुळे राज यांनी दुर्लक्षिल्या गेलेल्या नाशिककडे पुन्हा गांभीर्यपूर्वक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आठवडाभरात झालेला त्यांचा हा दुसरा दौरा त्याचेच निदर्शक. आगामी विधानसभा निवडणूक ते नाशिकमधून लढवितात की काय या चर्चाना पुन्हा उधाण आले आहे. दुपारी त्यांचे शहरात आगमन झाले. विश्रामगृहात काही काळ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा लवाजमा गंगापूर रस्त्यावरील गोदा उद्यान प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी रवाना झाला. वेगवेगळ्या कारणांस्तव दहा वर्षे रेंगाळलेल्या या प्रकल्पाची धुरा रिलायन्स फाऊंडेशनवर सोपविली गेली आहे. फाऊंडेशनने गोदावरीच्या काठावर नुकतेच काम सुरू केले. त्याची पाहणी राज यांनी केली. या वेळी संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर, आ. वसंत गीते, शहराध्यक्ष राहुल ढिकले, प्रवक्त्या शर्वरी लथ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सांस्कृतिक, पर्यावरण अनुकूल, कला आणि क्रीडा या चार संकल्पनांवर आधारित गोदा उद्यान प्रथम पालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जागेत साकारण्याचे नियोजन आहे. ‘गोदा उद्यान नूतनीकरण’ असे नाव देऊन अस्तित्वातील प्रकल्पाचे नूतनीकरण केले जात असल्याचे दर्शविले जात आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या तंत्रज्ञांसोबत त्यांनी आराखडानिहाय नियोजन कसे असेल यावर चर्चा केली. याच ठिकाणी भुजबळ फाऊंडेशनमार्फत व्यायामासाठी ‘ग्रीन जीम’ची उभारणी केली आहे. गोदा उद्यानाच्या कामात ही व्यायामशाळा अवरोध ठरेल काय, याची चाचपणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या पाहणीनंतर शासकीय विश्रामगृहात बैठकांचे सत्र पार पडले. शहरातील जवळपास ४० वाहतूक बेटे प्रायोजकांच्या माध्यमातून साकारली जाणार आहेत. मुंबई नाका, महामार्ग बसस्थानक, सिटी सेंटर मॉल (उंटवाडी), शालिमार आदी बेटांचा त्यात अंतर्भाव आहे. या बेटांचे सुशोभीकरण करताना वैशिष्टय़पूर्ण संकल्पनांचा वापर केला जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रायोजकांशी विचारविनिमय करण्याचा अंतर्भाव राज यांच्या कार्यक्रमात होता. या शिवाय, नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून कामांची सद्य:स्थिती जाणून घेतली.