मत्स्यप्रेमींसाठी पर्वणी असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोळी महोत्सव दरवर्षीप्रमाणे माहीम कॉजवेवर सुरू झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सुपरस्टार सलमान खान यांची एकाच व्यासपीठावरील उपस्थिती हे यावर्षीच्या कोळी महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरले.
चटकदार कोळी खाद्यसंस्कृतीबरोबरच कोळी नृत्य, कोळी समाजाची संस्कृती अनुभवण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. रविवार २४ नोव्हेंबपर्यंत मनसे कोळी महोत्सव सुरू राहणार आहे.
कोळी संस्कृती कोळीवाडय़ांच्या चौकटीतून बाहेर काढून सर्वसामान्य मुंबईकरांसमोर आणण्याच्या हेतून हा कोळी महोत्सव सुरू झाला. बॉलिवूडमधील तारे-तारकांसह मराठी सिनेसृष्टीतील तारे-तारकांची गर्दीही या महोत्सवाला होणार आहे.
बोंबिल वडे, गाभोळी कोशिंबीर, कोळंबी भात, रावस बिर्याणी, तिसऱ्याचे भरले, माकलं, भरलेले शेवंडे अशा चटकदार कोळी खाद्यपदार्थाचा आस्वाद या महोत्सवात मांसाहारप्रेमींना घेता येईल. खाद्यपदार्थाचे जवळपास ४० स्टॉल या महोत्सवात आहेत.कोळी बँड, दादूसचा वाद्यवृंद, कोळी गीते, सजवलेली होडी या माध्यमातून कोळीवाडाच अवतरणार आहे. केवळ पारंपरिक कोळीवाडय़ातील कोळी समाजाच्या संस्था आणि व्यक्तींनाच स्टॉल उभारण्याचे आमंत्रण देण्यात आल्याची माहिती मनसेचे आमदार व या महोत्सवाचे आयोजक नितीन सरदेसाई यांनी दिली.