मनसेने वाशीम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. मनसेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर ते लोकसेवक बनून कार्य करणार असल्याची त्यांनी शपथ घेतली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ‘मोदी फॅक्टर’ नव्हे, तर ‘राज फॅक्टर’ चालेल, असा दावा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद एंबडवार यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
येथील मनसेच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आनंद एंबडवार बोलत होते. यावेळी मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष नवीन आचार्य, यवतमाळ जिल्हा संपर्क अध्यक्ष श्रीधर जगताप, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर, अभय गडम, वाशीम जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, जिल्हा सचिव रणजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष आनंद गडेकर उपस्थित होते. यावेळी मनसेचा ‘कर्तव्यनामा’चे प्रकाशन करण्यात आले. मनसेने जाहीरनाम्याऐवजी कर्तव्यनामा प्रकाशित करून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मनसेचा पुढाकार राहणार असल्याची ग्वाही या कर्तव्यनाम्यात दिली असल्याचे एंबडवार यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद निवडणुकीत इतर राजकीय पक्षांची गटबाजी मुंबईपर्यंत पोहोचली आहे. मात्र, मनसेचे कार्यकर्ते स्वत:च्या खर्चाने आपली निवडणूक लढवत आहेत. प्रस्थापित पक्षांपेक्षा मनसेचे उमेदवार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असून प्रत्येक घरात मनसेचा उमेदवार आपला कर्तव्यनामा घेऊन मतदारांशी वार्तालाप करत आहे. मनसेला युवा मतदार आवर्जून मतदान करणार असून युवाशक्तीच स्वच्छ राजकारणावर विश्वास ठेवणारी असल्याचेही यावेळी आनंद एंबडवार यांनी सांगितले.
वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसेने ३० जागांवर उमेदवार उभे केले असून तीन उमेदवारांना पुरस्कृत केले आहे, तसेच सहा पंचायत समितीत ५८ उमेदवारांना मनसेने उमेदवारी दिली असून पाच उमेदवारांना पुरस्कृत केले असल्याचे यावेळी आनंद एंबडवार यांनी सांगितले.