मनसेच्या राजकीय वाटचालीत मिशन २०१४ कडे राज ठाकरे यांनी लक्ष पुरविले आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ाकडे विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. १२ फेब्रुवारी रोजी पहिली सभा कोल्हापुरात होणार असून त्या वेळी मनसैनिकांनी पक्षाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन मनसेचे प्रवक्ते व सरचिटणीस शिरीष पारकर यांनी मंगळवारी येथे बोलताना केले.    
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा येथे मंगळवारी झाला. अध्यक्षस्थानी मनसेचे विधिमंडळाचे उपगटनेते आमदार वसंत गीते होते. पारकर म्हणाले, मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथे मनसेने लक्ष केंद्रित केले होते. तेथे यश मिळाल्यानंतर आता राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या भूमीत मनसे रुजविण्याचा इरादा व्यक्त केला आहे. आगामी सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जाणार आहेत. त्यामध्ये यश खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.    
आमदार गीते म्हणाले, नाशिकमध्ये मनसेने जो यशाचा पॅटर्न राबविला आहे, तोच कोल्हापूरमध्ये रुजला पाहिजे. सर्वाधिक आमदार निवडून आणण्याच्या स्पर्धा जिल्ह्य़ाजिल्ह्य़ामध्ये सुरू होणार असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला पाहिजे.     
माजी जिल्हाध्यक्ष नवेज मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. या वेळी मानवाधिकार संघटनेचे पुणे विभाग संघटक महेश कुर्डेकर, भारतीय कामगार सेनेचे माजी तालुका प्रमुख अजित मोडेकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे शहर सरचिटणीस मिथुन गर्दे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप देवूसकर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तानाजी इंगळे यांनी मनसेत प्रवेश केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आमदार रमेश पाटील, संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार, महिला आघाडी प्रभारी स्वाती शिंदे, चंद्रकांत खोडे, अनिल वाघ यांची भाषणे झाली. अभिजित साळोखे, राजू बोरे, दिवाकर पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी पाहुण्यांना महालक्ष्मीची चांदीची मूर्ती भेट दिली. प्रसाद पाटील यांनी स्वागत केले.