महापालिकेत काम करताना संथपणा खपणार नाही. धडाडीने काम करणे जमत नसल्यास महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी कानउघाडणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली खरी, तथापि, महापौर बदलण्यासंदर्भात कोणतीही स्पष्टता केली नसल्याने अ‍ॅड. वाघ यांना कारभार सुधारण्याची संधी मिळाल्याचे दिसत आहे.
मुंबईत माहिमच्या कार्यालयात मंगळवारी राज यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा एकंदर नूर असाच होता. मनसेचे स्थानिक आमदार वगळता सर्व नगरसेवक व महापौर उपस्थित होते. सुमारे अर्धा तास चाललेल्या बैठकीत राज यांनी महापौरांना पुन्हा धारेवर धरले. महापालिकेतील सत्तेस दोन वर्षांचा कालावधी होऊनही शहरात विकास कामे होत नसल्याची ओरड विरोधक करतात. त्यांच्या आरोपांना महापौर या नात्याने उत्तर देण्याची जबाबदारी अ‍ॅड. वाघ यांची आहे. मनसेचे नगरसेवक आपापल्या वॉर्डात चांगली कामे करतात. झालेली विकासकामे शहरवासीयांपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडतो याची जाणीव राज यांनी करून दिली. यावेळी महापौरांच्या कामगिरीविषयी त्यांनी बैठकीत नगरसेवकांना विचारणा केली. परंतु, नगरसेवकांनी महापौरांविरोधात कोणतेही मतप्रदर्शन केले नाही. यावेळी प्रत्येकाचे स्वतंत्रपणे मत जाणून घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वाची एकत्रित बैठक झाल्यामुळे उघडपणे कोणी विरोध दर्शविला नाही. यामुळे राज यांनी महापौरांच्या कारभाराविषयी नाराजी प्रगट केली असली तरी त्यांना बदलण्याचा टोकाचा निर्णय टाळण्यात आल्याचे पहावयास मिळाले.
विरोधकांकडून आरोप झाल्यावर सुजाता डेरे यांसारखे काही नगरसेवक प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात. परंतु, महापौर वा स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर जावून मनसेची भूमिका मांडणे आवश्यक आहे. परंतु, तसे घडत नसल्याबद्दल राज यांनी संताप व्यक्त करत किमान पुढील काळात उभयतांनी ही जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी, अशी सूचना केली. महापौर, स्थायी समिती सभापती यांनी लोकांमध्ये दिसणे आवश्यक आहे. संबंधितांनी जनसंपर्क वाढविण्याकडे  लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. आजपर्यंत महापौरांचा कारभार अतिशय संथगतीने सुरू आहे. झटपट निर्णय घेतले जात नाही, विरोधकांच्या आरोपांना उत्तरे दिली जात नाहीत. यामुळे योग्य पध्दतीने काम करणे शक्य नसल्यास अ‍ॅड. वाघ यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असेही त्यांनी सुनावले. वातावरण तप्त असताना नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधात उघड प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे कारभारात सुधारणा करण्याचे निर्देश देऊन बैठक आटोपती घेण्यात आली. या संदर्भात अ‍ॅड. वाघ यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.