राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिन व समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीचा प्रारंभ भडकल गेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून करण्यात आला. मिलकॉर्नर चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ दिंडी आल्यानंतर जि. प. समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमुरे यांनी पुष्पहार अर्पण केला.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आर. यू. राठोड, प्र. ज. निकम गुरुजी, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त जयश्री सोनकवडे, औद्योगिक तंत्र प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. एस. बनसोडे आदी उपस्थित होते.
समता दिंडीत सरस्वती भुवन प्रशाला, जि. प. कन्या प्रशाला, शिशु विहार, शारदा मंदिर, बालज्ञान मंदिर आदी शाळांमधील विद्यार्थी तसेच शिक्षक, विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, भूसंपादन उपजिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार दत्ता भारस्कर, तहसीलदार विद्या शिंदे आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय स्तरावर असामान्य कार्य करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर त्यांचाच वारसा चालविणारे छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक स्तरावर असामान्य कार्य करून सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्य निवारण, आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यांना स्वयंरोजगार, बहुजनांसाठी वसतिगृह यासंबंधी सक्तीचे कायदे करून समाजाला विकासाची नवीन दिशा देण्याचे कार्य केले, असे उद्गार माजी न्या. डी. आर. शेळके यांनी काढले. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकर मुळे, विठ्ठलराव लहाने आदी उपस्थित होते.