प्रभा राव जयंतीला महिला मेळावाह्ण
देशभर महिलांच्या सुरक्षा व अधिकाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच राज्याचे अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आगामी अर्थसंकल्पात महिलांसाठी ठोस तरतुदी करण्याचे आश्वासन दिले, तर बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळेंनी राजकारणातील महिलांच्या सक्षमीकरणास चालना देण्याची ग्वाही देत महिलांना दिलासा दिला.
काँग्रेस नेत्या दिवंगत प्रभा राव यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांनी कस्तूरबा कला विज्ञान महाविद्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपरोक्त दोन्ही राज्यमंत्र्यांनी नवनियुक्त खासदार रजनी पाटील, पुष्पा बोंडे, ज्येष्ठ लेखिका शारदा साठे, संयोगिता मोरारजी, सुमन सरोदे, अभिनेत्री विद्या माळवदे या मान्यवर महिलांच्या साक्षीने महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.     
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असलेले राजेंद्र मुळक अर्थखात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळतात. या महिन्यात सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या पाश्र्वभूमीवर मुळक यांनी भाषणातून आगामी अर्थसंकल्पात महिलांसाठी ठोस तरतूद करण्याचे आश्वासन दिले. महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी योजना आहेत.
 विशेष निधीद्वारे त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. प्रभा राव यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद सांभाळताना महिला सक्षमीकरणाची बाब रेटली होती. महिलांनी चूल व मुलापुरतेच मर्यादित न राहता आत्मनिर्भर असावे, याकडे कटाक्ष ठेवून त्यांनी योजना पुरस्कृत केल्या होत्या. त्या मार्गदर्शक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.     बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनी प्रभा राव यांच्या कार्यास उजाळा दिला. परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजाचा महिलांप्रती दृष्टिकोण बदलण्याची गरज आहे. राजकारणातही त्यांना योग्य स्थान मिळण्याची गरज कांबळे यांनी व्यक्त केली.
खासदार रजनी पाटील यांनी आपल्या भाषणातून राज्याच्या आगामी महिला धोरणात महिलांच्या अधिकारांचा विशेष समावेश करण्याची मागणी केली. याप्रसंगी विविध क्षेत्रात गौरवास्पद सेवा देणाऱ्या लेखिका डॉ. सुनीता कावळे, नलिनी भोयर, संध्या देशमुख, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. राजसबाला धांदे, अ‍ॅड. अनुराधा सबाने, सरपंच कौसल्या लढी, नलिनी भोंगाडे व वहिदा शेख महम्मद शेख यांचा शाल-श्रीफ ळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना ढगे यांची विशेष उपस्थिती होती. हेमलता मेघे यांनी  मेळाव्याची भूमिका मांडली. शीतल अडगावकर व प्राचार्य डॉ. स्मिता वानखेडे यांनी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली.