रुग्णसेवेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे समर्पित भावनेने काम करीत असलेल्या ‘राजहंस प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘राजहंस पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखठणकर, संगीतकार अशोक पत्की आदींना जाहीर झाला आहे. येत्या १२ जानेवारी रोजी पुरस्कार प्रदान सोहळा गोरेगावात पार पडणार आहे.
राजहंस प्रतिष्ठान कलासेवा आणि रुग्णसेवा या क्षेत्रांत गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. गरजू रुग्णांना विनामूल्य रुग्णसाहित्य पुरवणे, खेडोपाडी वैद्यकीय शिबिरे भरवणे, देहदान, नेत्रदान, त्वचादान आदीविषयी समाजात जागृती निर्माण करणे असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे चालविले जातात. समाजाच्या विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान दरवर्षी संस्थेतर्फे ‘राजहंस पुरस्कार’ देऊन केला जातो. यंदा या पुरस्कारासाठी या तिघांसह श्यामराव विठ्ठल बँकेचे संचालक श्रीनिवास जोशी, उद्योजक अमित डहाणूकर, आमदार रवींद्र वायकर आदींनाही सन्मानित करण्यात येणार आहे. महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते पुरस्कारवितरण करण्यात येणार आहे.
गोरेगाव (पूर्व) येथील नंदादीप विद्यालयाच्या ‘कलाघर’ या सभागृहात १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ‘जादूची पेटी’ हा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.