शहरी भागात कुपोषणमुक्तीच्या नावावर राजमाता जिजाऊ योजना लागू करण्यासाठी सरकारने घिसाडघाई केली आहे. याबाबत अकॅडमी ऑफ न्युट्रीशन इम्प्रूव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी, शेतकरी नेते नारायण ओले पाटील आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अजय संघी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दुसऱ्या पक्षाशी चर्चा न करता लागू केलेला कोणताही कार्यक्रम संशयाचे वातावरण निर्माण करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाला अनुसरून अकॅडमीच्यावतीने करण्यात आलेले अध्ययन आणि प्रत्यक्ष केलेल्या सर्वेक्षणातून मिळालेली माहिती सरकारला २००७ मध्ये सादर करण्यात आली. आपला समाज आणि देश कुपोषणमुक्त, सक्षम आणि पूर्वीप्रमाणे बलशाली व्हावा, हेच अकॅडमीचे लक्ष्य आहे. परंतु सरकारने योजना लागू करण्याची अत्यंत घाई केली आहे, हा जनतेचा विश्वासघात आहे, असा आरोप डॉ. कोठारी यांनी केला आहे.
या मुद्यावर चर्चा करण्याचा अकॅडमीने वारंवार आग्रह धरूनही सरकारने योजना लागू करताना अकॅडमीसोबत चर्चा केली नाही किंवा बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. याबाबत संबंधित अधिकारी आणि वैज्ञानिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते केवळ सरकारच्या आदेशाचे पालन करीत आहेत, एवढेच उत्तर मिळाले. अधिकारी योजनेची केवळ अंमलबजावणी करीत असून कुपोषणासंबंधी हाती येत असलेली आकडेवारी चुकीची असून जनतेचे कोटय़वधी रुपये विनाकारण खर्च होत असल्याचे डॉ. कोठारी म्हणाले. हा कार्यक्रम पुढे नेण्याआधी आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी व्हावी, अशी मागणीही डॉ. कोठारी यांनी केली.
शहरी भागात ही योजना लागू करण्याच्या विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली जाईल. युवा पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जनतेने ही योजना समजून घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. कोठारी यांनी केले
आहे.