शहरातील अर्पण रक्तपेढीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘रक्तमित्र’ आणि ‘रक्त संघटक’ पुरस्कारांची घोषणा रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. एन. के. तातेड यांनी केली असून शुक्रवारी सकाळी १० वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
अर्पण रक्तपेढीच्या वतीने १२ वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येतात. रक्तदान शिबिरांसाठी मोलाचे योगदान देणारे संयोजक तसेच वेळोवेळी रक्तदान करून गरजूंना जीवदान देणारे रक्तदाते यांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक आ. अपूर्व हिरे, सपकाळ नॉलेज हबचे संस्थापक रवींद्र सपकाळ, समृद्धी जीवन फाऊंडेशनचे संस्थापक महेश मोतेंवार, प्रीमियम टुल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्याम केळुस्कर, कोल्हापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष श्याम नोतानी आणि अनिरुद्ध फाऊंडेशन या संस्थेला रक्तमित्र पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय रक्त संघटक पुरस्कारही दिले जाणार आहेत. पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती जगदीश सपट, आर. सी. बाफना, एस. एम. शहा, जेम्स अ‍ॅन्थोनी मुलाई, आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र पगारे आणि बॉश कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एच. बी. थोन्टेश उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन एन. के. तातेड, डॉ. अतुल जैन यांनी केले आहे.