उरणमधील प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्केच्या भूखंडाची त्वरित लॉटरी न काढल्यास सप्टेंबरमध्ये सिडकोविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रविवारी उरण येथील प्रकल्पग्रस्तांचा मेळाव्यात देण्यात आला.सिडको प्रकल्पग्रस्त संघटना व किसान सभा या दोन संघटनांनी उरण तालुक्यातील सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी रविवारी सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. उरण येथील एमएसईबीच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात सिडकोने उरण सर्व प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप करावे,प्रकल्पग्रस्तांची बांधकामे सभोवतालच्या जागेसह नियमित करा, साडेबारा टक्केमधून वगळेल प्लॉट परत करा, प्रकल्पग्रस्तांची बांधकामे साडेबारा टक्केमधून वगळू नये तसेच दहा वर्षांपूर्वी सिडकोने नवी मुंबई सेझला दिलेल्या जमिनी परत घेऊन उद्योग निर्माण करून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार द्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या.यावेळी किसान सभेचे अखिल भारतीय सचिव डॉ.अशोक ढवळे, सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष भूषण पाटील, कार्याध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, सचिव संजय ठाकूर तसेच अ‍ॅड.चंद्रहास म्हात्रे व पराग म्हात्रे यांनी आपले विचार मांडले. मेळाव्यात सिडको विरोधात उरणमधील प्रकल्पग्रस्तांनी एकजूट करून लढा देण्याचा निर्धार केला. यावेळी येत्या सप्टेंबरमध्ये सिडकोविरोधात धरणे आंदोलन तसेच सिडकोचे द्रोणागिरीमधील काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. या मेळाव्याला उरण तालुक्यातील महिलाही मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.