महिलांनी संघटित होऊन ताकद वाढवायला हवी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जिल्ह्य़ात महिला मेळावे घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा सेलच्या वतीने जिल्हा परिषद मैदानावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील,पालकमंत्री रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे निंबाळकर, मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, गीतांजली कदम, सुजाता यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांना निर्भय करणे हा आमचा उद्देश आहे, असं सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या,‘‘ सामाजिक प्रश्नात आपण महिलांवरील अत्याचाराची चर्चा करतो, परंतु घरगुती अत्याचाराबाबत आपण बोलत नाही. यासाठी महिलांनी मनातून सक्षम होण्याची गरज आहे. हे परिवर्तनाचे काम लगेचच होणार नाही. परंतु या परिवर्तनाला कमीत कमी वेळ लागेल असे प्रयत्न करू. महिलांना ताकद दिली तर काय बदल होऊ शकतात हे बचत गटांनी सिद्ध केले आहे. अर्थकारणाबरोबरच समाज व राजकारणात महिलांनी स्वयंपूर्णपणे काम करणे ही काळाची गरज आहे.’’
गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले,‘‘देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र पोलीस दलात महिलांची संख्या जास्त आहे. यावर्षांत आणखी वीस हजार महिला पोलिसांची भरती करण्यात येणार आहे.’’
शासन लाभार्थ्यांना अनेक योजनांचा व घरकुलांचा लाभ देते अशा अनेक ठिकाणी महिलांना त्रास होतो; प्रसंगी घर सोडून जावे लागते असे निदर्शनास येत आहे. त्यासाठी यापुढे लाभार्थ्यांमध्ये  व घरकुल योजनांमध्ये महिलांची संख्या जास्त असेल हे लक्षपूर्वक पाहिले जाईल. तेव्हा अशा स्त्रियांना कोणताही त्रास न होता त्या खंबीरपणे उभ्या राहू शकतील. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. परंतु घरगुती अत्याचाराबाबतही शासनाची ठोस भूमिका आहे.
दहशतवादाला कोणत्याही जाती-धर्माचा रंग नसतो. मात्र यापुढे आम्ही दहशतवाद्याच्या मनातील रंग हुडकण्याचा प्रयत्न करणार आहोत. या वेळी खासदार विद्या चव्हाण, निवेदिता माने आदींची भाषणे झाली.
 
आर. आर. पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘‘शाहरूख खानला राज्य शासनाने सुरक्षितता दिलेली आहे. तरीही त्याला येथे असुरक्षित वाटते याचेच आश्चर्य वाटते.’’