मराठवाडा कृषी विद्यापीठ नामांतराविरोधात शनिवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव या विद्यापीठास देण्याचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मराठवाडा कृषी विद्यापीठ नामांतरविरोधी विद्यार्थी कृती समितीने केला.
गेल्या २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठात वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचे जाहीर केले. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत झाले. दोनच दिवसांपूर्वी काही नागरिकांनी विद्यापीठाचे नामांतर करू नये, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा नामविस्तार करावा, अशी सूचना केली होती. शनिवारी मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नेट नामांतरालाच विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांची विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. नाईक यांच्याबाबत आदर असून कृषी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. परंतु मराठवाडा कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय मतपेटीवर डोळा ठेवून, तसेच राजकीय हेतूने प्रेरित आहे. या निर्णयामुळे मराठवाडय़ातील जनतेच्या अस्मितेला तडा गेला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. नाईक यांचे मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मितीत कुठलेही योगदान नव्हते. त्यांचा विद्यापीठ निर्मितीस विरोध होता, असा गौप्यस्फोट नामांतरविरोधी कृती विद्यार्थी संघर्ष समितीने निवेदनात केला आहे. कृषी विद्यापीठ नामांतराचा निर्णय तत्काळ रद्द करावा, सरकारने आपला निर्णय लादल्यास पुढील होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण डोंबे, उपाध्यक्ष सचिन खुणे, विकास भुजबळ, सचिव परिक्षित बोकारे यांच्या सह्य़ा आहेत.