नातवंडांवर चांगले संस्कार करताना त्यांना एकत्र कुटुंबात सांघिक जीवन जगण्याची सवय लावण्याचे काम आजी-आजोबांनी करावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश बोकील यांनी केले.
केशवराज प्राथमिक विद्यालयात आयोजित आजी-आजोबा मेळाव्यात बोकील बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार्यवाह नितीन शेटे होते. भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, शालेय समिती अध्यक्ष जितेश चापसी, मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
बोकील म्हणाले की, आज समाजात विभक्त कुटुंबपद्धती दिसून येत आहे. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित एकत्र कुटुंब पद्धतीची जडणघडण होणे गरजेचे आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा ही संस्काराची विद्यापीठे असतात. आपल्या नातवांना एकत्र कुटुंब पद्धतीत सांघिक जीवन कसे जगावे याचे संस्कार आजी-आजोबा देतात, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यानिमित्त विविध शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. या वेळी आजी-आजोबांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात शेटे यांनी आजी-आजोबांचे कुटुंबातील स्थान किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप जोशी यांनी आभार मानले. आजी-आजोबा मोठय़ा संख्येने उपस्थित होते.