पश्चिम नागपूर नागरिक संघ आणि श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवषीप्रमाणे यावर्षी ८ एप्रिलला रामनगरातील राम मंदिरातून शोभायात्रा निघणार असून ५० पेक्षा जास्त चित्ररथ आणि विविध राज्यांतील लोकनृत्य कलावंत सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जयंत आपटे यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम नागपुरात १९७६ पासून रामनवमीनमित्त शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी शोभायात्रेचे ३७ वे वर्ष असून शोभायात्रेत भाविकांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. सायंकाळी ५ वाजता राज्यमंत्री राजेंद्र मुळक, निको ग्रुपचे अध्यक्ष बसंतलाल साव यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी उद्योगपती अरुण लखानी, प्रमोद माकडे, विजय विंचुरकर, पोलीस आयुक्त के.के. पाठक, अ‍ॅड. आनंद परचुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  
शोभायात्रेत ५१ विविध आकर्षक चित्ररथ सहभागी होणार असून लोकनृत्य आणि स्केटिंग संघटनेची चमू सहभागी होणार आहे. शोभायात्रेतील मार्गावर चौकाचौकात संस्कार भारतीतर्फे रांगोळी काढण्यात येणार असून देखावे सादर करण्यात येणार आहेत. मार्गावर प्रवेशद्वार आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येईल.
लक्ष्मीभवन चौकात शेवाळकर डेव्हलपर्सद्वारे फटाका शो करण्यात येणार आहे. लक्ष्मीनगर आणि श्रद्धानंद पेठ भागात अभिजित मुजुमदार यांच्यातर्फे फटाका शोचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या शोभायात्रेत एक लाखापेक्षा जास्त नागरिक रामनानाचा जयघोष करीत सहभागी होतील.  शोभायात्रेचे धावते थेट समालोचन प्रा. अरविंद गरुड, आराधना गरुड आणि रवी वाघमारे करतील. प्रभू रामचंद्रांचा आकर्षक रथ विनोद सूर्यवंशी, मनोज ताजनेकर, निलेश माहुरकर यांनी तयार केला आहे.
आदर्श नवयुवक बहुउद्देशीय सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे आदिवासी नृत्य, बीन बेन स्पोर्टिंग क्लबचे प्रमुख आत्मराम पांडे यांच्या नेतृत्वाखाली फुटबॉलचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
 शोभायात्रेच्या मार्गावर विविध संस्था आणि व्यापारातर्फे प्रसाद वाटप, सरबत आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल. शोभायात्रा रामनगरातील राममंदिरातून सायंकाळी ५ वाजता निघेल. त्यानंतर लक्ष्मीभूवन चौक, कॉफी हाऊस चौक, झेंडा चौक, लक्ष्मीभवन चौक, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, डॉ. तोरणे यांचा दवाखाना, श्रद्धानंद पेठ, अभ्यंकरनगर, व्हीआरसीई कॉलेज, एलएडी कॉलेज, कापरेरेशन स्कूल हिल, बाजीप्रभू चौक मार्गे राममंदिरात शोभायात्रेचा समारोप होईल.
दरम्यान, दुपारी १२ वाजता राम मंदिरात राम जन्मोत्सव होणार आहे. शोभायात्रेच्या नामफलकाचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या करण्यात आले. निरंजन पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्टून शो सादर होणार आहे. शोभायात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, बसंतलालजी साव, अरुण लखाणी, देवेंद्र फडणवीस, तेजसिंह देशमुख, प्रशांत पवार यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला किशोर कोलवाडकर, चंद्रशेखर घुशे, राजीव काळेले आदी उपस्थित होते.