वाढत्या अतिक्रमणाच्या विळख्यात कोनेरी, घुटकाळा, तुकूम व गौरी तलाव नामशेष झाले असतांना जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला रामाळा तलाव व लेंढारा तलाव नष्ट होत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर कधी काळी हे तलाव होते, असे म्हणण्याची वेळ येणार आहे. मतांच्या जोगव्यासाठीच राजकारणी या तलावाचा बळी देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नदी व तलावांचा जिल्हा, अशी ओळख असलेल्या चंद्रपुरातून नद्यांपाठोपाठ आता तलावही नामशेष होत आहेत. वर्धा, वैनगंगा, इरई व झरपट या नद्या अतिक्रमणाच्या विळख्यात जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील कोनेरी, घुटकाळा, तुकूम व गौरी तलाव आज नामशेष होऊन त्याचे वॉर्डात रूपांतर झाले आहे. राजकारण्यांच्या मताच्या अघोरी हव्यासाला आता रामाळा तलाव सुध्दा बळी पडणार असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. जलनगरकडील भागाकडून दरवर्षी एक ते दोन घरे अनधिकृतपणे उभी राहतात आणि रामाळा तलाव थोडा थोडा बुजवला जातो. रेल्वे स्थानकाकडील भागातून या तलावात मोठय़ा व्यापारी इमारती सुध्दा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील या शेवटच्या तलावाचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. महापालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीव्दारा करण्यात आली आहे.
रामशहा या गोंडराजाने रामाळा तलाव बांधला होता. या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असे. एकेकाळी या तलावाचे क्षेत्रफळ सुमारे १५८ एकर होते. १९०८ मध्ये या तलावाच्या मधोमध रेल्वे रूळ टाकण्यात आल्याने तलावाचे दोन तुकडे झाले. तलावाच्या वरच्या भागात गोंड राजाने बनवलेली रामबाग होती. आता या बगिच्यावर वन विभागाचा ताबा आहे. शहरात एकही चांगला बगीचा नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे रामाळा तलावाच्या काही भागाचे सौंदर्यीकरण करून जिल्हा प्रशासनाने तेथे बगीचा तयार केला. पंधरा वषार्ंपूर्वी रामाळा तलाव रामाळा बगीचा बनल्याने ३० टक्के तलाव एकाच वेळी नष्ट झाला. २०११ मध्ये बगीचाच्या मुख्य प्रवेशव्दाराकडील भागात पुन्हा दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी नव्याने माती टाकून तीन ते चार एकर तलाव बुजवला गेला. एकीकडे असे शासकीय अतिक्रमण होत असतांनाच दुसरीकडे नागरिकांनीही अतिक्रमण करून रामाळा तलावात अनधिकृत घरे उभारणी सुरू केली.
शहरात अनधिकृत बांधकाम होत असतांना कुणीच लक्ष देत नाही आणि मग या अनधिकृत घरांना पक्के पट्टे द्या, अशी मागणी जोर धरू लागते, पण यात शहराच्या नियोजनाचे बारा वाजले, याकडे राजकीय पुढाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोपही ग्रीन प्लॅनेटने केला आहे. अशा लांगुलचालन करणाऱ्या राजकारण्यांमुळेच अतिक्रमणाचा विळखा सर्वत्र पसरला आणि गेल्या काही वर्षांत शहरातील तलावही एका पाठोपाठ एक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नष्ट झाले. येत्या २५ वर्षांत रामाळा तलावाचेही एखाद्या वॉर्डात रूपांतर होणार, अशी भविष्यवाणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. घुटकाळा तलावात झालेल्या अतिक्रमणामुळे घुटकाळा वॉर्ड तयार झाला आहे. तुकूम तलावातील अतिक्रमणाने तुकूम तलाव वॉर्ड आणि कोनेरी दादमहाल तलावाशी तुडलेला दादमहाल वॉर्ड, अशी बोलकी उदाहरणे शहरात आहेत. या मांदियाळीत रामाळा वॉर्ड हेही नाव जुळणारच आहे.
रामाळा तलावाला भविष्यातील अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी रामाळा तलावाच्या जलनगर भागाकडून एक संरक्षण भिंत बांधावी, रामाळा तलावाच्या उत्तरेकडे रेल्वे स्थानकाकडील भागात व्यापारी अतिक्रमण काढून घ्यावे व तलावातील घातक रासायनिक गाळ काढून टाकावा. तलावाच्या आतील ऐतिहासिक भिंतीची व घाटांची डागडुजी करून परिसराचे सौंदर्य वाढवावे. तलावाला वाचविण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या राज्य सरोवर संवर्धन योजनेकडे आर्थिक मदतही मागता येईल.
तलावाच्या संरक्षणाकरिता नागरिक व नगरसेवकांची समिती नेमावी व पुढील कार्यवाहीकरिता ठराविक काळाचा कृतिआराखडा तयार करावा, अशा उपाययोजना ग्रीन प्लॅनेट सोसायटीने सुचविल्या आहेत. शहरातील तलाव व जलस्त्रोतांना वाचविण्याची व त्यांचा दर्जा सुधारण्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे या उपायांवर ताबडतोब कार्यवाही करावी व शहरातील एकमेव ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवावा, अशी मागणी ग्रीन प्लॅनेटने महपालिकेकडे केली आहे.