हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचा औरंगाबाद शहरात पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त येथील पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री चव्हाण यांनी मराठवाडा विभागातील स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय, स्वातंत्र्यसैनिक संघटनांचे पदाधिकारी तसेच स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार एम. एम. शेख, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, अॅड. काशिनाथ नावंदर, ना. वि. देशपांडे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिकांनी तसेच त्यांच्या पाल्यांनी या वेळी विविध समस्या मांडल्या व निवेदनही दिले. स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनातील, सन्मान वेतनातील तफावत दूर करावी, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करावी, पाल्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण द्यावे, गृहनिर्माण संस्थांसाठी जागा द्याव्यात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. मुख्यमंत्री चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारला जाणे आवश्यक असून या बाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असे जाहीर केले.