नवी मुंबईत रमजान ईदच्या पाश्र्वभूमीवर विविध ठिकाणी खाद्यपदार्थासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरातील नेरुळ, तुभ्रे, कोपरखरणे, वाशी आदी ठिकाणी मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे.
वाशी सेक्टर ९ येथील मशीद परिसर, नेरुळ सेक्टर १५ येथील नूर मशीद, कोपरखरणे व घणसोली हजरत मेमूद शाह दर्गा या ठिकाणी शिग कबाव आदी चिकनचे पदार्थ तसेच डाळिंब, कलिंगड, पपई, अननस, सफरचंद, टरबूज आदी प्रकारची फळे, शेवया आणि इतर खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास या परिसरामध्ये मोठी गर्दी होत आहे. वाशी येथील विक्रेता फय्याज शेख यांनी सांगितले की, मी मागील ७ वर्षांपासून इफतार पार्टीसाठी लागणाऱ्या पदार्थाची विक्री करीत आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रमजानचा उपवास सुरू झाल्यापासून आम्ही या ठिकाणी फालुदा विक्री करतो व त्यास नागरिक भरभरून प्रतिसाद देत असल्याचे फालुदा विक्रेता मोहम्मद इलखाक यांनी सांगितले. या काळात आम्ही अनेक पदार्थ घरी बनवतो. मात्र तरी मी रमजाननिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुकानांवर विविध गोड खाद्यपदार्थ विकत घेत असल्याचे ग्राहक चॉंद शेख यांनी सांगितले. तर वाजवी दरात चांगले पदार्थ उपलब्ध होत असून मांसाहारी पदार्थ मी आवडीने घेतो असे शाकीर हुसेन याने सांगितले.