मागील बारा वर्षे राजकीय आशीर्वादाने आयुक्त पदाच्या नियुक्त्या घेऊन काम करणारे रामनाथ सोनवणे कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आयुक्त पदावरून बदली होऊनही हटण्यास तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २०१० पासून २०१३पर्यंत कल्याण-डोंबिवली पालिकेत आयुक्त म्हणून काम करणारे सोनवणे यांची ‘एमएमआरडीए’त बदली झाली. पण तेथे हजर न होता नऊ महिन्यांत आपले राजकीय वजन वापरून त्यांनी पुन्हा कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तपदी येण्यास बाजी मारली. या कालावधीत शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांनी ‘सोनवणे यांनी यापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांना तेथे पुन्हा नियुक्ती देता येणार नाही’ असे शासकीय टिपणीत म्हटले आहे. 

– स्वत:ची स्वच्छ, पारदर्शक प्रतिमा निर्माण करून शहराच्या विकास कामांत शून्य पडलेले सोनवणे बदली होऊनही राजकीय वजने वापरून बदली स्थगिती, रद्द करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना बकालपणा येऊनही पालिकेतील सत्ताधारी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे नगरसेवक सोनवणे यांच्या विषयावर मूग गिळून त्यांची पाठराखण करण्यात मश्गूल आहेत. विशेष म्हणजे सोनवणे यांची बदली रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ाच्या पालकमंत्र्यांपासून सर्वच शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत उमटत असलेल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया

31सोनवणे कागदी वाघ
– कल्याण-डोंबिवली शहरांची खरी वाट लावण्यात आयुक्त रामनाथ सोनवणे यांचा सिंहाचा वाटा आहे. राजकीय पदर धरून काही काळ प्रशासकीय काम करता येते. सदासर्वकाळ राजकीय पदर धरून काम केले की ठेकेदार, नगरसेवक यांच्या टोळ्यांशी संपर्क वाढतो. विकासकामे रखडतात. तेच सोनवणे यांच्या काळात सुरू आहे. मागील तीन वर्षांत रामनाथ सोनवणे यांनी कोणतेही काम केले नाही. त्यांच्या काळात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. रस्त्यांची दैना झाली आहे. स्वच्छ प्रतिमेचा आव आणणारे रामनाथ सोनवणे हे फक्त कागदी वाघ आहेत.
– स्टेला मोराईस, माजी नगरसेविका, कल्याण

33 खुर्चीला चिकटण्याचे गमक काय?
– कल्याण-डोंबिवली शहराचे बकालपण दूर व्हावे म्हणून सोनवणे यांच्या हकालपट्टीची आपण आमदार झाल्यावर मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मान्य करून या पालिकेला ‘आयएएस’ आयुक्त दिला आहे. परंतु, शिवसेनेचे नेते या ठिकाणी ‘आयएएस’ अधिकारी नको म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. या शहराचा विकास व्हावा, विविध प्रकल्प राबवण्यासाठी आयएएस आयुक्ताची गरज आहे. सोनवणे यांच्या हातून मागील चार वर्षांत जी वाट लागली ती जनतेने, शासनाने पाहिली आहे तरी शिवसेना सोनवणेंना पाठीशी का घालत आहे आणि बदली होऊनही सोनवणे आयुक्त पदाच्या खुर्चीला का चिकटून बसले आहेत. त्यांच्या खुर्चीला चिकटून राहण्याच्या कारणाची शासनाने चौकशी केली पाहिजे. – नरेंद्र पवार, भाजप आमदार, कल्याण

34सोनवणेंमुळे शहराचे नुकसानच
– डोंबिवलीतील सध्याचे वातावरण प्रदुषित आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील कामांचे धुळीचे सगळे लोट घरात येत आहेत. वर्षांनुवर्षे पालिकेची रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते खणून ठेवल्याने वाहनांना जागा नाही. राज्यात फक्त कल्याण-डोंबिवली पालिकेचा कारभार एवढा ढिसाळ कसा काय. शासनाने या ठिकाणी आयएएस आयुक्त दिला आहे. त्यांना तातडीने पालिकेत हजर राहण्याचे आदेश द्यावेत आणि सध्या जे आयुक्त सोनवणे आहेत त्यांनी खुर्ची खाली करावी. असे खुच्र्या अडवणारे अधिकारी शहराचे अधिक नुकसान करतात. – प्रदीप कुलकर्णी, डोंबिवली

35 आयुक्त ‘आयएएस’च हवा!
– ‘प्रमोटी’ आयुक्तांमध्ये धडाकेपणाने काम करण्याची धमक नसते. थेट आयएएस आयुक्त आणि ‘प्रमोटी’ यांच्यात हा फरक असतो. आयएएस आयुक्त कोणाच्याही ओंजळीने पाणी न पिता स्वत:च्या हिमतीने काम करतो. त्यामुळे नगरसेवक, ठेकेदार यांच्या टोळ्या बाजूला हटतात. कल्याण-डोंबिवली पालिकेला अनेक वर्षे हे प्रमोटी आयुक्त दिले गेले आहेत. त्यांनी काडीचेही काम न केल्याने या शहराला बकालपणा आला आहे. या शहराचा कायापालट करण्यासाठी आयएएस आयुक्ताने या शहराचा पदभार स्वीकारावा. शुद्ध श्वास नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि या शहराचे भले करावे. – अॅड. शिरीष देशपांडे, डोंबिवली

 37अशांना गडचिरोलीला पाठवा
– राजकारण्यांकडून चिरीमिरी घ्यायची. कार्यक्रम करायचे. ही येथील लोकांना सवय लागली आहे. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज या विषयांवर येथील नागरिक उघडपणे बोलत नाहीत. लोकांचा हा राजकीय माज कर भरणाऱ्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. प्रत्यक्ष काम करणारे आयुक्त जर नगरसेवक, आमदारांच्या ओंजळीने काम करीत असतील तर नागरिकांनी नागरी सुविधा मागायच्या कोणाकडे. मागील तीन वर्षे काम केलेले रामनाथ सोनवणे पुन्हा पालिकेत आयुक्त अवतरले आहेत. त्यांच्या चार वर्षांच्या काळात पालिकेचा सर्वाधिक ‘अवतार’ झाला आहे. असे राजकीय आडपडद्याने काम करणारे अधिकारी शासनाने गडचिरोली पट्टय़ात काम करण्यासाठी पाठवले पाहिजेत. – वीणा बेडेकर, डोंबिवली