नवनवीन उन्मेषाची उत्कृष्ट नाटके रसिकांना वारंवार पहायला, अनुभवयाला मिळावीत या उद्देशाने येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कुसुमाग्रज स्मारकात अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत ज्या नाटकांचे व्यावसायिक प्रयोग होऊ शकणार नाहीत अशा नाटय़ कलाकृती सादर करण्यात येणार असून रविवारी रात्री आठ वाजता ‘रंगालय’ या उपक्रमास सुरूवात होत आहे.
देशभर रंगभूमी गाजविलेल्या ‘आसक्त’ या पुण्याच्या संस्थेचे ‘एफ-१/१०५’ हे नवीन मराठी नाटक यावेळी सादर करण्यात येणार आहे. लेखन आशुतोष पोतदार यांनी केले असून दिग्दर्शन मोहित टाकळकर यांचे आहे. प्रकाश योजना प्रदीप वैद्य यांची आहे. वेशभूषा रश्मी रोडे, निर्मिती सूत्रधार आशिष मेहता यांचे आहे. यात मृण्मयी गोडबोले, राजकुमार तांगडे, सागर देशमुख, तृप्ती खामकर, आनंद क्षीरसागर आदींनी अभिनय केला आहे. आपले घर हिरव्या रंगाने सजवू पाहणाऱ्या सागर आणि मुमू या दोन पात्रांची आणि त्यांच्या कुटुंबाची गोष्ट नाटकात मांडण्यात आली आहे. हिरवा रंग देऊन घर सजविण्याचे वरवर साधे वाटणारे काम कुटुंबाचे आयुष्य ढवळून टाकणारी घटना ठरते. हे नाटक माणसांचे भाषा आणि संस्कृतीचेव्यवहार, त्यांची धार्मिक, आर्थिक, सामाजिक व्यवस्था यांच्या नानाविध रंगछटा सादर करत समकालीन बहुसांस्कृतिक समाजाचा एक दुखरा कोपरा समोर आणते. या नाटकानंतर अर्धा तास कलाकार, लेखक, प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या प्रयोगासंदर्भात अधिक माहितीसाठी ०२५३-२५७६१२५, ९४२२७५२२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.