जागतिक विक्रम नोंदविणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १५ हजार चौरस फुटांच्या भूखंडावरील महारांगोळी शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आली. अॅड. सी. आर. सांगलीकर फाऊंडेशनच्या वतीने आदमअली मुजावर या कलाशिक्षकाने गेले ५ दिवस जिल्हा क्रीडा संकुलात ही महारांगोळी रेखाटली आहे.
मुजावर यांनी रेखाटलेल्या या महारांगोळीची नोंद जागतिक विक्रम म्हणून करण्यात येत असल्याचे अॅड. सांगलीकर यांनी सांगितले. या कलाशिक्षकाने यापूर्वी ‘महाभारता’तील ‘भगवद्गीता’ सांगणारा रणांगणावरील श्रीकृष्ण, शिवाजीमहाराज, भगवान महावीर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा रांगोळीतून रेखाटल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त क्रीडा संकुलात ही महारांगोळी रेखाटण्यात आली असून, त्यासाठी ५ हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. चित्रप्रतिमेतील विविध रंगांसाठी ७०० किलो रंग वापरण्यात आल्याचे मुजावर यांनी सांगितले.