विजयादशमीपासून वेध लागतात ते दिवाळीच्या आगमनाचे. या सणाच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण असतो. या पंधरवाडय़ात प्रत्येक घरातील महिलावर्ग अंगणात भल्या पहाटे विविध रंगाची रांगोळी काढून अंगण सजवतात. प्रत्यक्ष दिवाळीत तर रांगोळीची रेलचेल असते. त्यामुळे विजयादशमीपासून रांगोळीची विक्री मोठय़ा प्रमाणात वाढते व दिवाळीपर्यंत संपूर्ण विदर्भात जवळपास एक हजार ट्रक रांगोळीची विक्री होते. एकटय़ा नागपुरात अडीचशे ट्रक रांगोळीची विक्री होत असल्याचे इतवारी, चुनाओळीतील ठोक विक्रेत्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशच्या जबलपूरजवळील भेडाघाट आणि गुजरातेतील छोटा उदयपूर येथून संपूर्ण विदर्भाला रांगोळीचा पुरवठा होतो. पांढऱ्या रंगाच्या रांगोळीपासून इतर रंगाच्या रांगोळ्या रंगवून तयार केल्या जातात. वेगवेगळे रंग केरोसिनमध्ये मिसळून पांढऱ्या रांगोळीला लावले जातात. अशाप्रकारे दहा ते पंधरा रंगात रांगोळी उपलब्ध होते. पांढऱ्या रंगापेक्षा अन्य रंगाच्या रांगोळीचे दर दुपट्टीने असतात. त्यामुळे अनेक व्यापारी ठोक दराने पांढरी रांगोळी विकत घेऊन त्याचे विविध रंग तयार करून विकतात.
सध्या बाजारात पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो दराने पांढरी रांगोळी तर रंगीत ३० ते ४० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. रंगीत रांगोळीला अधिक मागणी असल्याने चिल्लर विक्रेत्यांनी २५० ग्रॅमचे प्लास्टिकचे पाऊच उपलब्ध करून दिले आहेत. रंगीत रांगोळी विक्रीत बराच नफा मिळतो. रांगोळीला चमक यावी यासाठी झिंक तसेच फ्लोरोसेंट रंगाचा वापर करून पोपटी, केसरी, पिवळा, हिरवा, जांभळा, मोरपंखी, लाल, काळा, निळा आदी रंग तयार केले जातात. हे रंग एक हजार ते पंधराशे रुपये लिटर दराने मिळतात. नागपुरातील इतवारीसह, सक्करदरा, सीताबर्डी, महाल, गांधीबाग, सदर, इंदोरा, जरीपटका, गोकुळपेठ, खामला, रेशीमबाग, अजनी, मेडिकल चौक, कॉटन मार्केट, नंदनवन आदी भागात चिल्लर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. कोराडी परिसरातही रांगोळी तयार करण्यात येते. परंतु, ती महाग पडत असल्याने विक्रेते तेथेच विकतात. परंतु, जबलपूर येथील रांगोळी अधिक शुभ्र असल्याने त्याची मागणी संपूर्ण देशात आहे.
विदर्भातील नागपूर हे ठोक विक्रीचे केंद्र आहे. येथूनच संपूर्ण विदर्भात रांगोळीचा पुरवठा होतो. दिवाळीत घरे सजवल्यानंतरही अंगण सुशोभित केल्याशिवाय दिवाळीच्या सणात रंगत येत नाही. घराचे अंगण लहान असले तरी तेथेही छोटी का असे ना पण, रांगोळी काढलेली दिसून येते. विदर्भातील अनेक नागरिक विदेशात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना आवर्जून रांगोळी पाठवत असतात. यावरुन दिवाळीच्या सणामध्ये रांगोळीचे असलेले महत्त्व लक्षात येते.