शहरातील एका व्यापाऱ्याला सुहास कांदेची माणसे असल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच शिवसेनेत दाखल झालेल्या पण आधीपासून वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेल्या कांदेचे या प्रकरणात नांव आल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. त्याचा या घटनेशी काही संबंध आहे काय, याचा तपासही केला जात आहे.
या संदर्भात शरीफ बिलाल शेख या व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून निनाद शिवाजी बेरके व सचिन मानकर यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधून एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर संबंधितांनी गाडीतून उतरवून आपणास शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संशयितांनी ‘आम्ही सुहास कांदेची माणसे असून हप्ता वसुलीचा आमचा धंदा आहे, एक लाख रुपयांची खंडणी न दिल्यास गेम केला जाईल’ अशी धमकी दिल्याचे शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्यातील संशयितांना अद्याप अटक झालेली नाही. तक्रारदाराला धमकाविताना संशयितांनी सुहास कांदेचे नांव घेतल्याने पोलीस यंत्रणा सर्व शक्यता पडताळून पाहत आहे. मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या कांदेने पुढे काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले होते. लोकसभा निवडणुकीआधी तो शिवसेनेत दाखल झाला. त्याच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस यंत्रणेला धडा शिकविण्यासाठी काही वर्षांपूर्वी एका टोळक्याने सिडकोतील ३५ ते ४० वाहनांची जाळपोळ केली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पण, न्यायालयातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकाविणाऱ्या संशयितांनी त्याचे नांव घेतल्याने पोलीस यंत्रणा या घटनेशी त्याचा काही संबंध आहे काय, याची छाननी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.