01 December 2020

News Flash

रावसाहेब शेखावत थप्पड प्रकरणी पोलीस निरीक्षकांची बदली

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांना थप्पड मारण्याच्या प्रकरणात पोलीस उपायुक्तांच्या चौकशी

| September 7, 2013 02:25 am

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांना थप्पड मारण्याच्या प्रकरणात पोलीस उपायुक्तांच्या चौकशी अहवालाच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धोत्रे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय साळुंके यांना पाठवण्यात आले आहे. याशिवाय, गुप्तवार्ता विभागाच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून, रावसाहेब शेखावत यांच्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अजित पाटील यांनी गुरुवारी यासंदर्भात आदेश दिले.
 गेल्या २९ ऑगस्टला राजकमल चौकात आयोजित दहीहंडीच्या बक्षीस वितरण समारंभात आमदार रावसाहेब शेखावत यांना गजेंद्र उमरकर याने थापड लगावली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा पोलीस आयुक्त अजित पाटील हे रावसाहेब शेखावतांच्या बाजूलाच उभे होते. स्थानिक केबलवरून हा प्रसंग अमरावतीकरांनी ‘लाईव्ह’ पाहिला. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला, पोलीस आयुक्तांवर त्यांचा रोष होता. या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांची बदली करावी आणि कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक धोत्रे यांना निलंबित करावे, अशी मागणी उचलून धरली होती. अखेर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उपायुक्त संजय लाटकर यांना दिले.
 पोलीस उपायुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी अशोक धोत्रे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे स्थानांतरण पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. गुप्तवार्ता विभागाचे सुनील लासूरकर आणि रवी लोंढे यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे, तर सुरक्षा रक्षक राजेंद्र वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे. राजकमल चौक परिसर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, कोतवालीचे पोलीस निरीक्षक अशोक धोत्रे यांची त्यामुळे चौकशी झाली. त्यांच्या बदलीची चर्चा आधीच सुरू झाली होती. दुसरीकडे, रावसाहेब शेखावत यांना मारहाण करणारा गजेंद्र उमरकर सध्या येथील मध्यवर्ती कारागृहातच असून कोतवाली पोलिसांनी त्यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात अर्ज करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयात उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:25 am

Web Title: raosaheb shekhawat slap case cop transferred
Next Stories
1 शेतकरी अद्याप मदतीविनाच, साऱ्यांचीच आश्वासने फोल
2 आर्णीच्या भगवंत पतसंस्थेत लाखो रुपये अडकल्याने ठेवीदार संभ्रमात
3 महापालिकेत सफाई मशीन घोटाळा : रोजच्या नव्या माहितींमुळे खळबळ
Just Now!
X