उपचारादरम्यान बलात्कार केल्याचा आरोप असलेले डॉ. रुस्तम सोनावाला यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अखेर एक लाख रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर करीत दिलासा दिला. डॉ. सोनावाला यांची पोलीस कोठडी अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
दरम्यान, वैद्यकीय तसेच डीएनए चाचणीसाठी पोलीस डॉ. सोनावाला यांना एक दिवस ताब्यात घेऊ शकतात, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. या चाचण्या मुंबईबाहेर करण्यात येणार असतील तर डॉ. सोनावाला यांना एक दिवसांच्या पोलीस कोठडीत घ्यावे व चाचण्या मुंबईतच होणार असतील तर त्यांना १२ तासच ताब्यात घ्यावे, असेही निर्देश न्यायालयाने या वेळी दिले. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेताना सोनावाला यांनी पोलिसांना आपण आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यात येतो, असे सांगून पोबारा केला होता. त्यानंतर अटक होण्याच्या भीतीने त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर डॉ. सोनावाला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या आठवडय़ात सुट्टीकालीन न्यायालयाने त्यांना अटक न करण्याचे आदेश देत अंतरिम दिलासा दिला होता.
आपण सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी तसेच सहकार्यासाठी तयार आहोत. मात्र आपल्याला अटक केली जाऊ नये, अशी विनंती डॉ. सोनावाला यांनी याचिकेत केली होती. त्याचप्रमाणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी पोलिसांसमोर हजर होण्याचा कायद्याने अधिकार असून वैद्यकीय चाचणी येईपर्यंत पोलिसांनी त्याला अटक करू नये, असा युक्तिवाद डॉ. सोनावाला यांच्याकडून करण्यात आला.  त्याला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध करीत अशी मुभा दिल्यास आरोपी पुरावे नष्ट करण्याची वा त्याच्यात फेरफार करण्याची शक्यता असल्याचे म्हटले. परंतु न्यायमूर्ती रोशन दळवी यांनी पोलिसांचे म्हणणे अमान्य करीत डॉ. सोनावाला यांना एक लाख रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.