ज्योतिष पाहून घरातील अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून एका असाह्य़ महिलेवर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार केल्याप्रकरणी सोलापुरातील एका भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह बलात्काराच्या गुन्ह्य़ाखाली गुन्हा दाखल झाला आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
नरसिंह नरसप्पा तंतलकर (४५, रा. ईरण्णा वस्ती, रामवाडीजवळ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात पीडित महिलेने (४०) दिलेल्या फिर्यादीनुसार नरसिंह तंतलकर हा मूळ राहणारा कर्नाटकातील रायचूर येथील असून तो काही वर्षांपासून सोलापुरात राहतो. विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील नागनाथ मंदिरालगत एका झाडाखाली बसून तो ज्योतिष पाहतो. विवाह जुळविण्याचे कामही तो करतो. रामवाडी परिसरात राहणारी पीडित महिला आपल्या घरातील अडचणी सोडविण्यासाठी नरसिंह या भोंदूबाबाकडे आली. नरसिंह याने तिचे हस्तरेषा पाहून ज्योतिष सांगितले. घरातील अडचणींचे निवारण करण्याचे उपायही सांगितले. त्यावर विश्वास ठेवून सदर पीडित महिला ही वारंवार नरसिंह याच्या संपर्कात आली. तिच्या असाह्य़तेचा गैरफायदा घेऊन नरसिंह याने तिला जाळ्यात ओढले. गेल्या दोन वर्षांपासून तो तिला भूलथापा देऊन बलात्कार करीत होता. नरसिंह यास पाच मुले आहेत, तर पीडित महिलेलाही सहा अपत्य आहेत. तथापि, नरसिंह याने वारंवार केलेल्या बलात्कारातून पीडित महिला गरोदर राहिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे दिसून येताच भोंदूबाबाची गैरकृत्ये प्रकाशात आली. सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 14, 2014 2:45 am