शहरातील संजयनगर भागात माहेरपणासाठी आलेल्या विवाहितेवर दोघांनी मंगळवारी रात्री बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी संघर्ष भाऊसाहेब लांडगे व सागर बबन दळवी या दोघांना अटक केली असून, मनोज रामलाल जाधव हा अन्य एक आरोपी फरार आहे. रात्री साडेआठच्या सुमारास बळजबरीने एका ऑटोरिक्षात ओढून नेऊन सुशीलादेवी शाळेच्या पाठीमागील मैदानावर बलात्कार केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पीडित महिला अल्पवयीन असल्याची अफवा पसरल्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यासमोर दुपारी मोठी गर्दी जमा झाली होती.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजयनगर भागात नांदेड येथील व्यावसायिकाची पत्नी माहेरपणासाठी आली होती. काल रात्री तीन तरुणांनी ऑटोरिक्षाने पाठलाग केला. बळजबरीने रिक्षात बसविले. रात्री दहाच्या सुमारास बलात्कार केल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे. अशाच प्रकारची बळजबरी २६ मार्च रोजी संजयनगरमधील विनोद साळवे यानेही केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित महिलेचे वडील रंगकाम करतात. मंगळवारी संध्याकाळी घडलेली घटना पालकांना सांगितल्यानंतर आज सकाळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.