25 November 2017

News Flash

बलात्कार, विनयभंग घटले छेडछाड वाढली

मुंबईत चालू वर्षांत महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये घट झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त

प्रतिनिधी | Updated: December 28, 2012 12:14 PM

मुंबईत चालू वर्षांत महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये घट झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी आकडेवारी सादर करून महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस करीत असलेल्या उपययोजनांची माहिती दिली.
चालू वर्षांत (डिसेंबर १५ पर्यंत) एकूण २१३ बलात्काराचे गुन्हे नोंदविले गेले आहेत. गेल्या वर्षी बलात्काराच्या २१९ घटना घडल्या होत्या. यापैकी ३५ प्रकरणांत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाला होता, तर चालू वर्षी ६३ लोकांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे. याबाबत बोलतांना सिंग यांनी सांगितले की, किंचित घट झाली असली तरी ओळखीच्या लोकांकडूनच बलात्काराच्या जास्त घटना घडल्या आहेत. मागील वर्षी १३ प्रकरणात अनोळखी लोकांनी बलात्कार केले होते तर चालू वर्षांत १२ प्रकरणात अनोळखी व्यक्तींनी बलात्कार केला असल्याकडे त्यांनी सांगितले. विनयभंगाच्या गुन्ह्यातही घट झाल्याचे सिंग यांनी सांगितले. २०११ मध्ये विनयभंगाचे ५५६ गुन्हे नोंदविण्यात आले होते, तर २०१२ मध्ये ५१५ विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. यंदा अपहरणाच्या प्रकरणातही घट झाल्याचे सिंग यांनी सांगितले. २०११ मध्ये महिला आणि मुलींच्या अपहरणाचे १७४, तर २०१२ मध्ये १५६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हे गुन्हे कमी होत असले तरी छेडछाडीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. २०११ मध्ये छेडछाडीच्या १७७ गुन्ह्यांची नोंद होती. २०१२ मध्ये त्यात वाढ झाली असून वर्षभरात सुमारे १८३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महिलांवरील अत्याचारात मुंबईचा देशात ४८ वा क्रमांक असल्याचेही ते म्हणाले
सिंग यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे. त्याचा पुनरुच्चार करीत महिलांच्या अत्याचाराच्या प्रत्येक प्रकरणांवर पोलीस उपायुक्तांची नजर असेल असे त्यांनी सांगितले. तर महाविद्यालयातील विद्यार्थी विनयभंग आणि छेडछाड करताना आढळ्यास त्याच्या पालक आणि प्राचार्याना लेखी कळविले जाईल, असेही त्यांनी सांगितले. महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्यास हे गुन्हे कमी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First Published on December 28, 2012 12:14 pm

Web Title: rape misbehaviour reduced but molesting increased