पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका दलित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सतत चार वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केला व नंतर फसवणूक करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस बाप-लेकासह त्यांच्या कुटुंबीयांतील पाचजणांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस शिपाई स्टिफन नेल्सन स्वामी (नेमणूक जेलरोड पोलीस ठाणे) हा या गुन्ह्य़ात प्रमुख आरोपी असून यात त्याला मदत करून पीडित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी स्टिफनचे वडील असलेले सहायक फौजदार नेल्सन दयाल स्वामी तसेच आई सुरेखा स्वामी व बहिणी स्टिना व ख्रिस्तिना स्वामी (रा. अरविंद धाम पोलीस वसाहत, सोलापूर) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. अरविंद धाम पोलीस वसाहतीत राहणाऱ्या सदर पीडित तरुणीबरोबर पोलीस शिपाई स्टिफन स्वामी याने सलगी करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकावले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला स्वत:च्या घरात तसेच तुळजापूर रस्त्यावरील एका लॉजवर आणि पोलीस मुख्यालयातील आपल्या मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. गेल्या चार वर्षांपासून तो तिच्यावर दुष्कर्म करीत असे. मात्र लग्नासंबंधी विचारले असता जातीचे नाव पुढे करून स्वामी याने लग्नाला नकार दिला. तेव्हा पीडित तरुणीने स्टिफन स्वामीच्या घरी जाऊन त्याचे वडील सहायक फौजदार नेल्सन स्वामी व त्यांच्या कुटुंबीयांकडे दाद मागितली. परंतु स्वामी कुटुंबीयांनी तिला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली. तेव्हा पीडित तरुणीने अखेर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.