सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी माणिक नरसिंग चापलवार (महातपुरी) यास सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा गंगाखेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. सईद यांनी सुनावली.
या प्रकरणी माहिती अशी, की महातपुरी येथे मारोती खटींग यांच्या वीटभट्टीवर शेख कुटुंब काम करीत होते. ३० नोव्हेंबर २००९ रोजी बाजार असल्याने शेख यांनी आपल्या सात वर्षांच्या मुलीस वीटभट्टी मालकाकडे कामाच्या पशासाठी पाठवले. त्या वेळी ही मुलगी महातपुरीच्या बसस्थानकाजवळ वीटभट्टी मालकाची वाट पाहत असताना तेथे सीताफळ विक्री करणारा आरोपी माणिक चापलवार आला व मुलीस सीताफळाचे आमिष दाखवून स्वतच्या घरी नेऊन मुलीवर त्याने बलात्कार केला. आरडाओरड करू नये म्हणून तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. या बाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. मुलीने घरी आल्यावर आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने वीटभट्टीमालक खटींग यांच्या कानावर ही बाब घातली. परंतु खटींगने दुर्लक्ष केले. पीडित मुलीचे वडील दोन दिवसांनी बाहेरगावाहून आल्यानंतर सोनपेठ पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार देण्यात आली. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी चापलवार पसार झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. डी. िशदे यांनी केला व गंगाखेड सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याचे कामकाज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. सईद यांच्यासमोर चालले. सरकार पक्षाच्या वतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले. डॉ. श्रीमती झिकरे व पीडित मुलगी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली व आरोपीस ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व ५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. सरकार पक्षातर्फे अॅड. भगवान यादव यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. एस. पी. चौधरी यांनी सहकार्य केले.