समर्थ रामदास स्वामी संप्रदायात महत्त्वाचा मानण्यात येणारा आणि गेली काही वर्षे दुर्मिळ असलेल्या ‘श्रीसमर्थ गाथा’ या ग्रंथाचे मोरया प्रकाशनातर्फे ८५ वर्षांनी पुर्नप्रकाशन करण्यात येणार आहे. समर्थ संप्रदायातील अनंतदास रामदासी यांनी हा ग्रंथ लिहिला असून ६४० पृष्ठांच्या या ग्रंथाची किंमत अवघी शंभर रुपये आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी अनंतदास रामदासी यांची ५० वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने मराठवाडा येथील श्रीअनंतदास महाराज मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या ग्रंथाचे प्रकाशन केले जाणार आहे.
अनंतदास रामदासी यांनी अथक परिश्रम करून १९२८ मध्ये ‘श्रीसमर्थ गाथा’ हा ग्रंथ प्रकाशित केला होता. गेल्या काही वर्षांपासून हा ग्रंथ उपलब्ध नव्हता. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या अनेक रचना, अभंग या ग्रंथात देण्यात आले आहेत. मूळ गाथेतील अभंगांबरोबरच रामदास स्वामी यांच्या अन्य काही रचनांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. कठीण शब्दांचे अर्थ, वर्णानुक्रमे पद्यसुची, टिपा आदींचाही या गाथेत समावेश करण्यात आहे.
समर्थाच्या वाङ्मयाचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, त्यासाठी हा ग्रंथ अवघ्या शंभर रुपयात उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन यांनी दिली. इच्छुक आणि समर्थ संप्रदायातील भक्तांनी अधिक माहितीसाठी गौरी देव यांच्याशी ९२२३५०१०५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.