रा.स्व.संघाच्या राज्यभर होणाऱ्या राष्ट्रसाधना संमेलनाची सुरुवात यवतमाळपासून होणार आहे. रा.स्व.संघाचे राष्ट्रसाधना संमेलन रविवार, ११ जानेवारीला पोस्टल ग्राउंडवर आयोजित करण्यात आले असून या संमेलनात पुसद, यवतमाळ व वाशिम विभागातील २४०० गावातील १० हजार गणवेशधारी स्वयंसेवक पथसंचलन करणार आहेत. शारीरिक प्रात्यक्षिके, व्यायाम, योग, गीत आणि बौध्दिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती वार्ताहर परिषदेत विभाग कार्यवाह रमेश पांडे यांनी दिली.
संघाच्या शाखा वाढवणे आणि रा.स्व.संघात गणवेशधारी स्वयंसेवकांची संख्या वाढवणे हा या संमेलनाचा हेतू असून राज्यभर अशी विभागीय संमेलने होणार असून यवतमाळात पहिले विभागीय संमेलन होत असल्याचे पांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. यावेळी प्रदीप वडनेरकर, जिल्हा कार्यवाह आनंद पांडे, नगर कार्यवाह संतोष मुत्तेलवार, अजय मुंधडा आदी उपस्थित होते. पांडे म्हणाले, डिसेंबर २००१ मध्ये विद्यमान सरसंघचालक आणि तत्कालिन सरकार्यवाह मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रचेतना संमेलन झाले होते. यानंतर प्रथमच यवतमाळात संघाच्या स्वयंसेवकांचे एकत्रिकरण होणार आहे. राष्ट्रसाधना संमेलन विदर्भात सर्व ठिकाणी होणार आहे. याची सुरुवात यवतमाळपासून होत आहे.

सकाळी १० वाजता स्वयंसेवकाचे शहरात आगमन होईल. त्यांच्यासाठी तीन ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी त्यांच्या बठकी, भोजन आणि संचलनाची तयारी होईल. दुपारी २.१५ मिनिटांनी नंदुरकर विद्यालय, जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, विवेकांनद विद्यालय या ठिकाणावरून पथसंचालनास प्रारंभ होईल. तिन्ही पंथसंचलनाचा संगम दुपारी २.४५ मिनिटांनी बसस्थानक चौकात होणार आहे. त्यानंतर ३.४५ पर्यंत जाहीर कार्यक्रमाकरिता सर्व स्वयंसेवकाचे पोस्टल ग्राउंडवर एकत्रिकरण होईल. त्यांनतर सायंकारी ६ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात ध्वजारोहण, शारीरिक प्रात्यक्षिके, व्यायाम योग, गीत आणि वक्त्यांचे उदबोधन होईल. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख अरुण कुमार उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या तयारीसाठी सुभाष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली २८ जणांची स्वागत समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवाय, हे संमेलन पर्यावरण पुरक राहणार आहे. बसस्थानक चौकात होणाऱ्या पथसंचालनाचा त्रिवेणी संगम व पोस्टल ग्राउंडवरील जाहीर कार्यक्रमास जिल्ह्य़ातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पथसंचालनातच स्वयंसेवकाचा मृत्यू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशधारी स्वयंसेवकाच्या आठ दिवसांपूर्वी पार पडलेल्या शिस्तबध्द पथसंचालनातच एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते जागीच कोसळून गतप्राण झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ निर्माण झाली. डॉ. मल्हार भास्करराव गलगलीकर, असे (६३) असे या स्वयंसेवकाचे नाव आहे. गुरुवारी अणे महिला महाविद्यालयात मध्यप्रदेशातील वनवासी कल्याण आश्रमांचे संघटनमंत्री प्रकाश काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत कार्यवाह नामदेव मरापे, रमेश पांडे, राष्ट्रसेविका समितीच्या सुलभा गौळ, शैलजा जोशी, वसंतराव पांडे आणि मोरेश्वर चरेगावंकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.