सप्टेंबर महिन्यापासून राज्यात औद्योगिक, व्यापारी व शेतकऱ्यांच्या वीज दरात प्रचंड वाढ झाली असून या दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आले असताना राज्यातील सर्व संघटना राज्य समन्वय समितीच्या अंतर्गत एकत्रितपणे वीज दरवाढीला प्रचंड विरोध करीत आहेत. विविध बैठकांमार्फत वेळोवेळी निवेदनांव्दारे शासनाला उद्योगांच्या नुकसानीची कल्पना देण्यात आलेली आहे. तरी त्यासंदर्भात शासनाकडून कोणत्याही स्वरुपाचे निर्णय घेण्यात येत नसल्याने अखेर १० डिसेंबर रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळी नाका येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) यांच्या वतीने आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.
वीज दरवाढीविरोधात याआधी राज्य समन्वय समितीच्या मार्फत राज्यभरात वीज देयकांची होळी देखील करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वीज दरवाढप्रश्नी निर्णय घेण्यासाठी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती गठीत केली. त्यामुळे उद्योजकांसह सर्वानाच या समितीकडून अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. ही समिती त्वरीत निर्णय घेऊन उद्योजकांना समाधान देईल असे वाटत होते. परंतु सर्व अपेक्षा फोल ठरल्या. राणे समितीने देखील अद्याप काही ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे राज्य समन्वय समितीने वीज दरवाढीस विरोध कायम ठेवून राज्यात १० डिसेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास पाठिंबा देण्याचा निर्णय निमामध्ये आयोजित बैठकीत सर्व संघटना व उद्योजकांनी घेतला. उद्योजकांचा मनस्ताप केवळ वीज दरवाढीपुरताच मर्यादित राहिला असे नसून दरवाढीचे कारण पुढे करीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी देयकांमध्ये ४० टक्क्यांपर्यंत भरमसाठ दरवाढ केली. त्याबद्दलही उद्योजकांनी या बैठकीत तीव्र भावना व्यक्त करीत विरोध केला. उद्योजकांच्या मागण्यांकडे लक्ष न देणाऱ्या शासनाला महाराष्ट्रातील उद्योगांच्या परिस्थितीची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याअंतर्गत १० डिसेंबर रोजी विल्होळी नाका येथे सर्व संघटनांचे सभासद व पदाधिकारी रस्त्यावर उतरणार असून महामार्गावरील वाहतूक रोखून धरणार आहेत. हे आंदोलन अभूतपूर्व यशस्वी होण्यासाठी पूर्व तयारीविषयक बैठक आठ डिसेंबर रोजी निमा हाऊस येथे घेण्यात येणार आहे. आंदोलन विषयक निर्णय घेतलेल्या बैठकीच्या व्यासपीठावर मनिष कोठारी, धनंजय बेळे, लक्ष्मण सावजी, मारुती कुलकर्णी, ज्ञानेश्वर गोपाळे, मिलिंद राजपूत, अॅड. सिद्धार्थ सोनी, मंगेश पाटणकर, विलास देवळे, गिरीश पालवे आदी उपस्थित होते.