उरण-पनवेल रस्त्यावरील जासई नाक्यावर मंगळवारी रात्री ९ वाजता कंटेनरने जोरदार धडक दिल्याने जासईमधील जीवन घरत (४४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, या अपघातानंतर जासई ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोकोनंतर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप असून या संदर्भात गुरुवारी जासई येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत १ जून रोजी सकाळी जासई नाक्यावरच रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या मार्गावरील जड वाहनांच्या बेदरकारीमुळे आणखी किती बळी हवेत, असा सवाल केला आहे.
जासई नाक्यावरील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्ता रुंदीकरणासाठी येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी शासनाकडून मोबदला स्वीकारलेला नाही. या संदर्भात ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मान्य करून गावाला दिलेल्या विकासाचे आश्वासन पूर्ण करण्याची अट घातली आहे. तर दुसरीकडे याच मार्गाच्या सहा पदरीकरणाचाही प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण व जेएनपीटीने जाहीर केला आहे. त्यासाठीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. अशा स्थितीत जड वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षभरात जासई परिसरात पाच ते सहा अपघातांत चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही अपघातांची मालिका थांबविण्यासाठी रस्ते विकास प्राधिकरणाने येथील शेतकऱ्यांचे शेतीचे थकीत मोबदले वाढीव दराने द्यावेत, तसेच मंगळवारच्या घटनेत मृत पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. त्याच प्रमाणे अपघातानंतर जासई ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोकोच्या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी १ जून रोजी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जासई ग्रामस्थ संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.