पुरोगामी विचारवंत तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी कोल्हापूर येथे झालेल्या हल्ल्याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. सोमवारी दुपारी डावे पक्ष, समविचारी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत मेहेर चौफुलीवर रास्ता रोको केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला. यावेळी आंदोलनकर्ते आणि वाहनधारकांमध्ये शाब्दीक चकमकी उडाल्या. पानसरे यांच्यावरील हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पानसरे यांच्यावरील हल्ल्याची माहिती समजल्यानंतर डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, समविचारी संघटना यांच्यावतीने येथील हुतात्मा स्मारकात सकाळी तातडीने बैठक झाली. यावेळी आयटकचे राजू देसले, माकपचे श्रीधर देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. काही पदाधिकाऱ्यांना भावना अनावर झाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात हा दुसरा भ्याड हल्ला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर ज्या पध्दतीने हल्ला झाला, तसाच हल्ला पानसरे यांच्यावर झाल्याचे देसले यांनी नमूद केले. याआधीच्या सरकारने दाभोलकर हत्येचा निषेधही केला नाही. परिणामी हल्लेखोरांची हिंमत वाढली आहे. युती सरकारची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली आहे. हल्लेखोरांचा त्वरीत शोध घेऊन त्यांना गजाआड करण्याची मागणी देसले यांनी केली.
हल्लेखोरांना त्वरीत अटक न केल्यास डाव्या आघाडीच्यावतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देशपांडे यांनी त्यांना दिला. बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने रास्ता रोकोचा निर्णय घेतला.
पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत शालिमार, एम.जी. रोडमार्गे मेहेर चौफुलीवर पोहोचले. या ठिकाणी त्यांनी अचानक मानवी साखळी करत रास्ता रोको सुरू केले.
अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे वाहनधारक व कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. वाहने पुढे जाऊ नयेत म्हणून कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करत वाहने तसेच पादचाऱ्यांनाही जाऊ देण्यास मज्जाव केला. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या दिला. काही उत्साही कार्यकर्त्यांनी वाहनधारक ऐकत नसल्याचे पाहत त्यांना दंडुक्याने प्रसाद देण्याचा प्रयत्न केला. काहींनी हुज्जतही घातली. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समज दिल्यावर आंदोलकांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मध्यवस्तीतील वाहने खोळंबल्याने पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
आंदोलकांची दांडगाई
डावी आघाडी, समविचारी संघटनांकडून करण्यात आलेले रास्ता रोको सुरुवातीला शांततेत सुरू होते. वाहनधारकांना शांततेने सहकार्य करण्याचे आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने एका कार्यकर्त्यांने वाहनधारकाच्या पाठीत दंडुका घातला. याचवेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असतांना तिला अपशब्द वापरण्यात आले. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी समजूत घातल्यावर कार्यकर्त्यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला.
पोलिसांची नामी युक्ती
सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वाहने मागविली. मात्र, ही वाहने वाहतूक कोंडीत अडकल्याने पोलिसांना काहीच करता येत नव्हते. या गर्दीत रस्त्याच्या एका बाजूला रुग्णवाहिका बाहेर जाण्यासाठी धडपड करत असतांना पोलिसांनी केवळ आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिकेला जाऊ द्या, अशी विनंती केली. कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिली. या संधीचा फायदा घेत अन्य वाहनधारकांनी आपली वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिसांनीही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली.