कर्नाटकातील हुबळी येथे देशपांडे फाऊंडेशनच्या वतीने ‘लिडर्स अ‍ॅक्स्लेटरिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम (लीड) उपक्रमातंर्गत आयोजित ‘युवा समिट-२०१३’ कार्यक्रमात येथील उदय बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली.
या कार्यक्रमास इन्फोसिसचे एन. आर. नारायणमूर्ती, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, सुधा मूर्ती, गुरूराज देशपांडे, जयश्री देशपांडे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात कर्नाटक व नाशिकच्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सामाजिक प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनातील सवरेत्कृष्ट प्रकल्पांना रतन टाटांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या नाशिकमधील उदय बहुउद्देशीय संस्थेसाठी हा पहिलाच कार्यक्रम होता. तरीही नाशिकमधील राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या विद्यार्थ्यांनी बसमध्ये प्रवास करताना येणाऱ्या अडचणी व उपाययोजना, राष्ट्रीय स्तरावर अंधांसाठी गायन स्पर्धेचे आयोजन, केटीएचएममधील विद्यार्थ्यांनी अंधांसाठी आर्थिक मदत व पुस्तक दान हे प्रकल्प सादर केले. या परिषदेसाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे प्रशांत देऊळकर, मोहंमद हुसेन, अमोल लोखंडे, गजेंद्र माकोडे, तुषार देशमुख, योगेश पाटील यांसह केटीएचएममधील ममता बडगुजर, नवनाथ गिते, मेट-बीकेसी कॉलेजमधील रवी यादव हे विद्यार्थी सहभागी झाले होते. योगेश पाटील या अंध विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अंध क्रिकेट संघात निवड करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादरीकरणासाठी उदय बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्थेचे प्रशांत भार्गवे, सारिका सावकार, मधुकर देवकर, सीमा यादव यांचे सहकार्य लाभले.