जागतिक शिक्षणाच्या मूल्यमापनाची बरोबरी करणा-या भारतातील मोजक्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सोलापूरच्या वालचंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीला (डब्ल्यूआयटी) मानांकन प्राप्त झाले असून, ‘एआयसीटीई-सीआयआय’च्या सर्वेक्षणामध्ये वालचंद अभियांत्रिकीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाला प्रथम क्रमांक मिळाले आहे.
देशभरातील तंत्रशिक्षण महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षण उद्योजकांना किती प्रमाणात पोषक आहे, याचे मूल्यमापन करण्यासाठी नवी दिल्लीच्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयटीसीई) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. यात देशातील १०५० अभियांत्रिकी शिक्षण संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यात सोलापूरचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वश्रेष्ठ ठरले असून, या महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने ‘बेस्ट इंडस्ट्रीज-लिंक्ड इन्स्टिटय़ूट’ हे देशातील प्रतिष्ठेचे प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त केल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद दोशी व सचिव डॉ. रणजित गांधी यांनी सांगितले. ही बाब केवळ सोलापूरसाठी नव्हे, तर महाराष्ट्राला अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सर्वागाने परिपूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कल्पनाशक्तीला वाव देणे, त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या बुद्धीचा उपयोग उद्योगांना नेमकेपणाने करून घेता आला पाहिजे, अशा साधक गोष्टींचा विचार करून, उद्योग व शिक्षण या दोहोंतील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी ‘एआयटीसीई-सीआयआय’ यांनी संयुक्तपणे राबविलेल्या सर्वेक्षणाला देशातील केवळ ३० टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सामोरे जाण्याचे धारिष्टय़ दाखविले होते. या ताज्या सर्वेक्षणानुसार वालचंद अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये सामावून घेण्यासाठी कंपन्यांची चढाओढ लागते, ही बाब अरविंद दोशी, डॉ. रणजित गांधी व प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी निदर्शनास आणली.